बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट असं आमिर खानला म्हटलं जातं. मात्र आमिर खान सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतो आहे. याचं कारण आहे आमिर खान आणि कियारा आडवाणी यांची एक जाहिरात यासाठी कारणीभूत ठरली आहे. आमिर खानची जाहिरात हिंदूविरोधी असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही या जाहिरातीवरून संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे जाहिरात?
आमिर खान आणि कियारा आडवाणी या दोघांनी एका बँकेची जाहिरात केली आहे. या जाहिरातीत दोघंही वधू-वराच्या वेशात दिसत आहेत. मात्र कियाराऐवजी आमिर खानची पाठवणी केली जाते. आमिर माप ओलांडून कियाराच्या घरी राहण्यासाठी येतो असं दाखवण्यात आलं आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरांना छेद देत आम्ही नवं काहीतरी करू इच्छितो असं या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. मात्र नेटकऱ्यांनी आमिर खानची ही जाहिरात हिंदूविरोधी असल्याचा आरोप केला आहे.
काय म्हटलं आहे नेटकऱ्यांनी या जाहिरातीबाबत?
एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की आमिर खान कायमच हिंदू परंपरांची थट्टा उडवताना दिसतो. ही बँकेची जाहिरात फक्त हिंदूंसाठीच आहे का? इतर धर्माच्या लोकांना त्यांच्या परंपरा बदलण्याचा संदेश ही बँक देईल का? दुसरा एक नेटकरी म्हणतो की आमिर खानला हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणी दिला? #AamirKhan_Insults_HinduDharma हा हॅशटॅगही ट्रेंड झाला आहे.
ही जाहिरात AU बँकेची आहे. या बँकेलाही अशी जाहिरात करताना लाज वाटली पाहिजे असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
विवेक अग्नीहोत्री यांचीही आमिर आणि कियारावर टीका
द काश्मीर फाईल्स या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही आमिर खान आणि कियारा आडवाणीवर ही जाहिरात केल्यावरून निशाणा साधत या दोघांनाही मूर्ख म्हटलं आहे. तसंच ट्विटरवर या जाहिरातीवरून चांगलाच गदारोळ सुरू झाला आहे.
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचाही आमिरला इशारा
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही आमिर खान आणि कियाराच्या जाहिरातीवर भाष्य केलं आहे. अशा जाहिराती करताना हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या जातात. धार्मिक परंपरा आणि चालीरिती काय आहेत हे लक्षात घेऊन जाहिरात केली पाहिजे. मी पण बँकेची जाहिरात पाहिली आहे. माझ्याकडे यासंदर्भात तक्रारही आली आहे. आमिर खानकडून सातत्याने अशी विरोधी कामं समोर येत आहेत. आमिर खानने असं करणं योग्य नाही. कुठल्याही धर्माचा अनादार करण्याचा अधिकार आमिर खानला नाही असंही नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT