महाराष्ट्रात सध्या भोंग्यांचा विषय चांगलाच गाजतोय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला घेतलेल्या सभेत आणि ठाण्यातल्या उत्तर सभेत मशिदीवरचे भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला आव्हान दिलं आहे. आता याच मुद्द्यावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला जोरदार टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
‘3 तारखेला ईद.. तोवर मशिदीवरील भोंगे उतरवा, नाहीतर…’, राज ठाकरेंचा थेट अल्टिमेटम
मनसे नेते राज ठाकरे यांनी सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरेंनी हा इशारा दिला आहे की ३ मेपर्यंत मशिदींवरचे भोंगे काढले गेले नाहीत तर प्रत्येक मशिदीपुढे लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावली जाईल. आता हे प्रकरण कोणत्या दिशेने जाणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र राज ठाकरेंवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना सगळ्यांनीच टीका केली आहे.
संजय राऊत यांनी तर राज ठाकरेंना भाजपचा भाडोत्री भोंगा असंही म्हणून टाकलं आहे. तर आज आदित्य ठाकरे यांनीही भोंग्यावरून प्रश्न विचारला असता मनसे आणि भाजपला टोला लगावला आहे. महागाई इतकी का वाढली? पेट्रोल डिझेलचे दर का वाढत आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोकांना भोंग्यावरून द्या असं आदित्य ठाकरे यांनी भाजपला सुनावलं आहे. त्याआधी जेव्हा त्यांना मनसेबाबत आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला होता तेव्हा संपलेल्या पक्षांबाबत मी बोलत नाही असं मनसेला त्यांनी सुनावलं होतं.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मशिदींवरील भोंग्यांचा त्रास अख्ख्या देशाला होतो आहे. यात धार्मिक विषय कुठे आहे? तुम्हाला जो काय नमाज पडायचा आहे जी काय अजान द्यायची असेल ती घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते का अडवता? प्रार्थना तुमची आहे तर आम्हाला का ऐकवता. जर सांगून तुम्हाला समजत नसेल की, भोंगे खाली उतरवा.. तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका. हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार..’ असं ठामपणे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सांगितलं.
‘वातावरण आम्ही नाही बिघडवत आहोत. हा धार्मिक विषय नाहीच आहे हा सामाजिक विषय आहे. सर्वांना या गोष्टीचा सकाळी त्रास होतो. दिवसभरातून पाच-पाच वेळा तुम्ही नमाज पडता. एक तर सगळे बेसूर असतात. काय म्हणून आम्ही ऐकायचं?’
‘रस्त्यावर घाण झाली तर आपण साफ करतो. फुटपाथवर घाण झाली तर फुटपाथ आपण साफ करतो. मग जर कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत. आणि राज्य सरकारला आमचं सांगणं आहे की, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा एकदा काय तो सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. ज्या देशांमध्ये बंदी आहे तिथे निमूटपणे ऐकता ना तुम्ही.’ असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याला विरोध दर्शवला. याबाबत आदित्य ठाकरे यांनी मात्र टीका केली आहे. भोंग्यावरून जनतेला महागाई कशी झाली ते पण सांगा असं सुनावलं आहे.
ADVERTISEMENT