अफगाणिस्तानात २० वर्षानंतर पुन्हा एकदा तालिबानची राजवट आल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या वेगवान घडामोडीनंतर राष्ट्रीय सलोखा परिषदेचे अध्यक्ष अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी महत्त्वाची माहिती दिली. अब्दुल्ला यांनी देश सोडून गेलेल्या अशरफ घनी यांचा माजी राष्ट्राध्यक्ष असा उल्लेख केल्यानं त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचं निश्चित झालं आहे. तसंच काबूलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी चर्चेसाठी वेळ द्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
काबूलच्या सीमेवर येऊन धडकल्यानंतर तालिबानने शांततेनं सत्ता हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव अशरफ घनी यांच्या सरकारसमोर ठेवला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंकडील शिष्टमंडळाची राष्ट्रपती भवनात चर्चा सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली. अशरफ घनी हे ताजिकिस्तानच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती प्रभारी गृहमंत्र्यांनी दिली. टोलो न्यूजने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
दरम्यान, राष्ट्रीय सलोखा परिषदेचे अध्यक्ष अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी सध्या सुरू असलेल्या घडामोडींबद्दल माहिती दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी घ्यावी, अशी सूचना त्यांनी लष्कराला केलं आहे. त्याचबरोबर काबूल शहरात प्रवेश करण्यापूर्वी चर्चेसाठी वेळ द्यावा, असं आवाहन त्यांनी तालिबानला केलं आहे. ही माहिती देत असताना अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचा माजी राष्ट्राध्यक्ष असा उल्लेख करत ते देश सोडून गेले असल्याचं सांगितलं. त्यामुळे अशरफ घनी सत्तेतून पायउतार झालं असल्याचं निश्चित झालं आहे.
अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करण्याचा तालिबानचा प्रयत्न जवळपास यशस्वी ठरताना दिसत आहे. कंदाहार, शरीफ-ए-मजार सह अनेक प्रांत आणि शहरं ताब्यात घेणाऱ्या तालिबाननं रविवारी अफगाणिस्तानच्या सत्तेचं केंद्र असलेल्या काबूलच्या सीमेवर धडक दिली. काबूलला वेढा दिल्यानंतर अफगाणिस्तानात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. तालिबानला काबूलवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, तर अफगाणिस्तानात सत्तांतर अटळ असल्याचं बोललं जात होतं. रविवारी याचं दिशेनं सर्व घडामोडी घडल्या.
तालिबानी बंडखोरांनी काबूलची नाकाबंदी केली. तसेच शहरातही शिरकाव केल्यानं प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर तालिबाननं शांततेत सत्ता सोपवण्याचा प्रस्ताव घनी यांच्या नेतृत्वाखाली सरकारसमोर ठेवला. तालिबाननं काबूलला वेढा दिल्याचं लक्षात आल्यानंतर प्रभारी गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनी अहिंसेच्या मार्गानं सत्तेचं हस्तांतर केलं जाईल असं स्पष्ट केलं होतं.
त्यानंतर तालिबानचं शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनात पोहोचलं. दोन्ही शिष्टमंडळाच्या चर्चेकडे सगळ्याचंच लक्ष लागलेलं असताना गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्याची माहिती दिली. टोलो न्यूजने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. अशरफ घनी यांच्यासह काही नेत्यांनी काबूल सोडलं आहे. अशरफ घनी हे ताजिकिस्तानच्या दिशेनं रवाना झाले असल्याचं मिर्झाकवाल यांनी सांगितलं.
राष्ट्रपती भवन तालिबानच्या ताब्यात
राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी राजीनामा देऊन पलायन केल्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला सुरूवात झाली आहे. अफगाणिस्तानचे माजी गृहमंत्री अली अहमद जलील यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन होणार असल्याचं वृत्त असून, घनी यांच्या पलायनानंतर तालिबाननं राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आहे.
ADVERTISEMENT