मुंबई: Maharashtra Sadan scam Case: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी (Maharashtra Sadan scam) विशेष एसीबी कोर्टाने (Acb court) पाच आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. यावेळी कोर्टाने असंही म्हटलं आहे की, या संपूर्ण तपासातच त्रुटी आहेत आणि यात फक्त सरकारी पक्षाचं समर्थन करणारे कागदपत्रं जोडले गेले आहेत. याच आधारे कोर्टाने पाच आरोपींची निर्दोष सुटका केल्यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील आपली निर्दोष सुटका व्हावी यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी देखील कोर्टात अशाच प्रकारचा अर्ज दाखल केला आहे. याच प्रकरणात छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना तत्कालीन फडणवीस सरकारने तुरुंगात टाकलं होतं.
दरम्यान, आता या प्रकरणी पाच आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याने आपल्यावरील आरोप देखील कोर्टाने रद्द करावेत अशी मागणी भुजबळांच्या वतीने करण्यात आलेल्या अर्जात केली गेली आहे.
दरम्यान, न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात पाच जणांची निर्दोष सुटका करताना तपास अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. लाचलुचपत विभागच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अत्यंत घाईघाईने एफआयआर नोंदवून अयोग्य आणि बेकायदेशीरपणे कारवाई केली असल्याचं कोर्टाने आपल्या निकालपत्रात म्हटलं आहे.
कोर्टाने याप्रकरणातील चमणकर डेव्हलपर्समधील पाच जणांची सुटका करताना असंही म्हटलं आहे की, ‘तथ्य आणि पुरावे स्पष्टपणे दर्शवतात की डेव्हलपर के एस चमणकर एंटरप्रायझेसने व्यवहारात कोणतीही अनियमितता केलेली नाही. तसेच करारामध्ये विकासकाला कोणताही अनुचित लाभ देण्यात आलेला नाही.’ याच आधारे त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
यावेळी कोर्टाने एसीबीचे अधिकारी नरेंद्र तळेगावकर यांच्या तपासाबाबत देखील काही प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी तपासात फक्त सरकार पक्षाचे समर्थन करणारे कागदपत्र जोडण्यात आले होते. यावेळी दुसऱ्या बाजूचे कोणतेही कागदपत्र जोडण्यात आलेले नसल्याचं निरिक्षण कोर्टाने नोदंवलं आहे.
भाजपमधून बाहेर पडल्यानंतर काय त्रास होतो हे दाखवायचं असल्यानेच खडसेंची ईडी चौकशी-भुजबळ
छगन भुजबळ यांनी 2005 साली सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना कथितपणे निविदा न मागवता केएस चमणकर एंटरप्रायजेस कंपनीला कंत्राट दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याप्रकरणी ईडीने देखील कारवाई केली होती. याचप्रकरणी भुजबळांविरोधात एसीबीने कोर्टात कलम 409 आणि कलम 471 अ अंतर्गत खटला दाखल केला होता. याचप्रकरणी आपली निर्दोष सुटका करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आता आपल्या अर्जाद्वारे केली आहे.
ADVERTISEMENT