मालकाशी वादावादी झाल्यानंतर ड्रायव्हरने मालकाचाच ट्रक चोरुन नेल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच फिल्मी स्टाईलने पाठलाग करत त्यांनी ड्रायव्हरला अटक केली आहे. बारामती-जेजुरी रस्त्यावर सोमवारी रात्री हे थरारनाट्य रंगलं.
ADVERTISEMENT
बाबा नाजरकर असं या आरोपीचं नाव असून तो मुळचा जालना येथील दाफेगावचा राहणारा आहे. सध्या कामानिमीत्त आरोपी बारामतीमध्ये तांदुळवाडी भागात राहत होता. मालक अमोल गुरव यांच्यासोबत झालेल्या वादावादीनंतर बाबा नाजरकर यांनी हा ट्रक चोरून नेला. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशा थरारक पद्धतीने पोलिसांनी हा ट्रक पाठलाग करुन अडवला.
चोरलेला ट्रक मोरगावच्या दिशेने जात असल्याचं कळताच पोलिसांनी पाठलाग करायला सुरुवात केली. पोलीस आपल्या मागावर असल्याचं कळताच आरोपी ड्रायव्हरने कोणालाही न जुमानता ट्रक जोरात पळवायला सुरुवात केली. रात्री १० वाजल्यापासून ते १२ वाजेपर्यंत बारामती-पुणे मार्गावर सासवडपर्यंत हा थरार सुरु होता. आरोपी चालवत असलेला ट्रक थांबवण्यासाठी पोलिसांनी मोरगावमध्ये पिकअप, जेजुरीत कंटेनर मध्ये लावला…परंतू यामधूनही वाट काढत आरोपीने पोलिसांना आव्हान देणं सुरुच ठेवलं.
मधल्या रस्त्यात आरोपी ट्रक झिकझॅग पद्धतीने चालवायला लागला. यादरम्यान आरोपीने वाटेतील काही वाहनं आणि सलूनचं दुकानही उडवलं. १२० च्या वेगाने चालवणारा ट्रक अखेरीस पोलिसांनी सासवडजवळ रात्री १२ वाजता थांबवला. ट्रक थांबवल्यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता परंतू पोलिसांनी त्याला वेळेत ताब्यात घेतलं. आरोपीने हाच ट्रक पुढे पुण्यापर्यंत नेला असता तर रस्त्यावरील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. परंतू बारामती पोलिसांनी वेळेत ट्रकला थांबवल्यामुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळला.
ADVERTISEMENT