महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने २९ जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. ३० जूनला झालेल्या या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
ADVERTISEMENT
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लाटा मोजत बसलेत का? मंत्रिमंडळ विस्तार का नाही?-शिवसेना
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा होणार विस्तार?
‘मुंबई Tak’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता २० जुलैला म्हणजेच राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात १० ते १२ मंत्र्याना शपथ दिली जाईल. त्यानंतर २५ जुलैपासून अधिवेशन सुरू होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होणार होतं. मात्र १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन २५ जुलैपासून सुरू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज शिंदे फडणवीस सरकारने औरंगबाद, उस्मानाबाद या दोन्ही शहरांची नावं बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला. आधीच्या सरकारने केलेला निर्णय घाईत केलेला होता. तो कायदेशीर लढाईत टिकला नसता कारण बहुमत नसताना तो निर्णय घेतला गेला होता. त्यामुळे फेर प्रस्ताव घेण्यात आला आणि तो मंजूर करण्यात आला आहे. आमचं बहुमताचं सरकार आहे तोच हा निर्णय कायदेशीर पद्धतीने घेईल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्या दोघांनीही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं सांगितलं आहे. शुक्रवारच्या सामनातून मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने टीका करण्यात आली होती. तसंच राज्यपाल लाटा मोजत बसले आहेत का? ते आता या नव्या सरकारला प्रश्न का विचारत नाहीत? त्यांना मार्गदर्शन का करत नाहीत हे विचारण्यात आलं होतं. तसंच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याच्या मुद्द्यावरून टीका केली होती. दोघेच महाराष्ट्राचे मालक आहेत का असा सवाल त्यांनी केला होता.
या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार २० जुलैला केला जाईल असं समजतं आहे. मुंबई तकला सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT