सातारा : झी स्टुडिओच्या हर हर महादेव आणि महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांच्या विरोधात सध्या वातावरण तापलेलं दिसून येतं आहे. या चित्रपटांमध्ये चुकीचा इतिहास दाखविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबतं संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत आहे. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा येणं ही चांगलीच बाब आहे मात्र इतिहासाची मोडतोड झाल्यास गप्प बसणार नाही असा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
संभाजीराजे छत्रपती यांच्यानंतर साताऱ्याची गादीही या चित्रपटांविरोधात आक्रमक झाली आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी इतिहासाचा खेळ करणाऱ्या चित्रपटांना बॉयकॉट करावं, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, चित्रपटांमधे इतिहासाची मोडतोड करून इतिहासाचा खेळ करू नये, असं केल्यास या चित्रपटांना लोकांनी बॉयकॉट करावं. हे चित्रपट पाहू नये, असा दम भरला.
संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले होते?
खासदार संभाजीराजे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वेडात मराठे वीर दौडले सात आणि हर हर महादेव या चित्रपटांवरून संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यामुळे त्यावर कुणी सिनेमा करणार असेल तर ती कौतुकाचीच बाब म्हटली पाहिजे. राजस्थानचे महाराणा प्रताप घराणं सोडलं तर अनेक ऐतिहासिक सिनेमा आले आहेत.
मात्र असे काही सिनेमा इतिहासाची मोडतोड करून काढले जात आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली जाते आणि सिनेमात सादर केलं जातं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमांबाबत आणि मावळ्यांबाबत आम्ही हे मुळीच सहन करणार नाही. इतिहासाचा विपर्यास केला जातो आहे. असे सिनेमा लोकांपुढे कसे घेऊन जायचे? शिवाजी महाराज, त्यांचे मावळे ही आपली प्रेरणा आहे. त्यात सिनेमॅटिक लिबर्टी कशी चालेल? इतिहासाचा गाभा का सोडत आहेत? असेही प्रश्न संभाजीराजेंनी विचारलं आहे.
ADVERTISEMENT