मुंबई : शिवसेनेतील शिंदे गटाचा दसरा मेळावा बुधवारी (५ ऑक्टोबर) बांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर होत आहे. जवळपास 3 ते 4 लाख कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहतील असा अंदाज शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या मेळाव्याला येणाऱ्या कार्यकर्ते आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहनांच्या पार्किंगसाठी शिंदे गटाला मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील जागा देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मात्र या जागेवरुन आता शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष घालून विद्यापीठातील जागा राजकीय पक्षाला देण्याच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी युवा सेनेने केली आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील जागा देणे हा प्रकार विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिंदे गटाने सर्व नियम धाब्यावर बसवून पार्किंगसाठी संकुलातील झाडांवर बुलडोझर फिरवला आहे. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत असून एकाही राजकीय वाहनाला विद्यापीठात प्रवेश देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे. तर राजकीय दबावापोटी संबंधित यंत्रणांकडून हा निर्णय घेतला गेल्याचा आरोप करत विद्यापीठ हे राजकीय व्यासपीठ होऊ नये, इतर राजकीय पक्षदेखील यापुढे मागणी करतील आणि त्याचा पायंडा निर्माण होईल. त्यामुळे ही परवानगी देऊ नये, असे म्हणत युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी याला विरोध केला आहे.
दरम्यान, या ठिकाणी कोणत्याही झाडांची कत्तल झालेली नाही. मुळात ही जागा पार्किंगसाठी घेताना पूर्ण नियमानुसारच घेण्यात आलेली आहे. पावसामुळे इथे चिखल झालेला आहे. त्यामुळे तेथे साफसफाईचे काम सुरु आहे, असा खुलासा शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे. तर विद्यानगरी परिसरातील निश्चित करून दिलेली काही जागा अटी व शर्तींच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्यात आली असल्याचा खुलासा मुंबई विद्यापीठाने केला आहे.
ADVERTISEMENT