मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले परंतु, अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी काल सांगितले होते की येत्या रविवार पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. आणि फडणवीस तातडीने दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर देवेंद्र फडणवीस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. फडणवीस तातडीने दिल्लीला का गेले याचे उलट सुलट अर्थ लावले जात आहेत.
ADVERTISEMENT
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला?
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मागच्या १ महिन्यापासून रखडला आहे. एकनाथ शिंदे यांना आतापर्यंत सर्वाधिक वेळा विचारलेला प्रश्न म्हणजे ”मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?”. आता येत्या पाच तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील ७ आणि भाजपचे ७ असे मंत्री पहिल्या टप्प्यात शपथ घेणार असल्याचे माहिती सुत्रांनी दिली आहे. आणि त्याच्याच चर्चेसाठी फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती आहे. फडणवीस दिल्लीवरुन कोणती बातमी घेऊन येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला, न्यायालयात कुणी काय सांगितलं?
भाजपतील कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात मिळू शकते संधी?
मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल निश्चित माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान, भाजपतून कुणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते, याबद्दल सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात वरिष्ठ आमदारांना स्थान मिळणार असून, यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांना संधी दिली जाऊ शकते, असं सांगितलं जात आहे.
शिंदे गटातून कुणाची लागणार मंत्रिपदी वर्णी?
शिंदे गटात अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक असले, तरी सुरूवातीला मोजक्याच लोकांना शपथ दिली जाणार असून, यात दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संदीपान भुमरे, संजय सिरसाट, अब्दुल सत्तार आणि बच्चू कडू (अपक्ष) यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते, अशी माहिती आहे.
ADVERTISEMENT