राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी
ADVERTISEMENT
बीकेसीवर जो दसरा मेळावा पार पडला त्यानंतर हे स्पष्टच झालं की खरी शिवसेना कुणाची आहे? आमची शिवसेनाच खरी आहे असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर दसरा मेळाव्यात आपण भाषण का केलं नाही? याचंही कारण उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. उदय सामंत यांचं नाव भाषणांच्या यादीत होतं. तरीही उदय सामंत यांनी भाषण केलं नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावरही उदय सामंत यांनी उत्तर दिलं.
काय म्हटलं आहे उदय सामंत यांनी?
बीकेसीवर जो दसरा मेळावा झाला त्या मेळाव्याने हेच सिद्ध केलं की खरी शिवसेना आमची आहे. असं महत्त्वाचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे. निवडणूक आयोगासमोर ठाकरे विरूद्ध शिंदे गट ही लढाई सुरू आहे. निवडणूक आयोगाचा निकालही आमच्या बाजूने लागेल असा विश्वासही शिंदे गटाने व्यक्त केला आहे. अशात उदय सामंत यांनी खरी शिवसेना आमचीच आहे हे स्पष्ट केलं आहे.
भाषण का केलं नाही? त्याबाबत काय म्हणाले उदय सामंत?
बीकेसीवर शिवसेनेचा जो दसरा मेळावा झाला, त्यावेळी भाषणांमध्ये माझं नाव 100 टक्के होतं. सगळेच जर भाषण करत राहिले असते तर 11 वाजले असते. त्यामुळे शिंदे साहेबांना मी स्वतः पुढाकार घेऊन सांगितलं, की खूप वेळ झालेला आहे, मी भाषण करत नाही. शेवटी भाषणं किती व्हायची हा देखील एक मुद्दा असतो, त्यामुळे कोणी नाराज असण्याचं कारण नाही, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच या भाषण न केल्यानंतर ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्याला पूर्णविराम दिला आहे.
आणखी काय म्हणाले उदय सामंत?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची चांगली भूमिका मेळाव्यात मांडली आहे. परवाच्या मेळाव्यावरून खरी शिवसेना कोणाची आहे हे देखील फायनल झालेलं आहे. शिवाजी पार्कवर किती खुर्च्या लागतात, किती माणसं बसू शकतात, हे रेकॉर्ड बीएमसीकडे आहे आणि पोलिसांकडे देखील आहे. बीकेसीच्या तिन्ही ग्राऊंडवर किती खुर्च्या लावलेल्या होत्या आणि आजूबाजूला किती लोकं होती. हे देखील रेकॉर्ड पोलिसांकडे आहे. तिप्पट-चौपट गर्दी शिंदे साहेबांना ऐकण्यासाठी होती, असं सामंत म्हणत उदय सामंत यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीवरही भाष्य
अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून पोस्टर्स लागलेले आहेत. याबाबत बोलताना सामंत म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीनं कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीने जो उमेदवार दिला आहे, त्यावर आमचा आक्षेप असण्याचा प्रश्नच नाही. लटके यांना उमेदवारी जाहीर झाली असेल तर त्यांना शुभेच्छा!
निवडणूक आयोगाच्या दारात जो वाद आहे त्याबाबत काय म्हणाले उदय सामंत?
निवडणूक आयोगाबाबत बोलताना सामंत म्हणाले की, उद्धव ठाकरे गटाला तीन वेळा वेळ वाढवून दिली होती. शुक्रवारीही शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यतचा वेळ ठाकरे गटाला वाढवून दिला होता. त्यामुळे पुरेसा वेळ दिला नाही हे म्हणणं योग्य नाही, ही सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगासमोर आहे. ही यंत्रणा स्वायत्त, त्यामुळे त्या यंत्रणेविरोधात बोलणं योग्य नाही. शुक्रवारी कदाचित काही लोकांना खात्री झाली असेल शिवसेना म्हणून बाळासाहेब यांचा विचार पुढे नेताना शिंदे यांच्यासोबत किती लोकं आहेत, याची माहिती मिळाली असेल, कुठेतरी बाबी पुढे येत आहेत. तसेच काही लोकांना किती शपथपत्रं दिली आहेत, कुणा सोबत किती पदाधिकारी, आमदार, खासदार आहेत हे कळल्यामुळे ही सर्व चर्चा सुरु झाल्याचं म्हणत उद्धव ठाकरे गटाला त्यांनी टोला लगावला.
ADVERTISEMENT