युद्धजन्य अफगाणिस्तानातून भारतीय आणि इतर देशांच्या राजदूतांना सोडवून आणणाऱ्या Indian Air Force ची शौर्यगाथा

दिव्येश सिंह

• 02:49 PM • 20 Aug 2021

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सध्या जगभरात या घटनेचे पडसाद उमटत आहेत. तालिबानच्या राजवटीखाली रहायला लागू नये म्हणून नागरिक काबूल विमानतळावर गर्दी करताना दिसत आहेत. भारतानेही अफगाणिस्तानातील आपल्या दुतावासातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुखरुप बाहेर काढलं आहे. १९९२ सालीही अफगाणिस्तानात अशीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी भारतीय हवाई दलाने रेस्क्यु ऑपरेशन करत अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय लोकांना […]

Mumbaitak
follow google news

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सध्या जगभरात या घटनेचे पडसाद उमटत आहेत. तालिबानच्या राजवटीखाली रहायला लागू नये म्हणून नागरिक काबूल विमानतळावर गर्दी करताना दिसत आहेत. भारतानेही अफगाणिस्तानातील आपल्या दुतावासातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुखरुप बाहेर काढलं आहे. १९९२ सालीही अफगाणिस्तानात अशीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी भारतीय हवाई दलाने रेस्क्यु ऑपरेशन करत अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय लोकांना बाहेर काढलं होतं.

हे वाचलं का?

या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या स्कॉर्डन लिडर (नि.) राजेश कुमार यांनी १९९२ साली झालेल्या रेस्क्यू ऑपरेशनचा अनुभव मुंबई तक सोबत शेअर केला आहे.

राजेश कुमार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी २९ वर्षांपूर्वी अशाच परिस्थितीतून भारताचे तत्कालीन राजदूत, दूतावासातले कर्मचारी आणि इतर आशियाई देशांमधील अधिकाऱ्यांना बाहेर काढलं होतं. याच रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान राजेश कुमार यांची अफगाणिस्तानचे माजी उप-राष्ट्रपती जनरल अब्दुल रशिद यांच्यासोबत भेट झाली होती. अमेरिकेने अफगाणिस्तानात आपलं पाऊल ठेवण्याच्या आधीच भारतीय हवाई दलाने युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्याचं राजेश कुमार अभिमानाने सांगत होते.

“१९९२ चं वर्ष होतं आणि त्यावेळी आग्रा येथील आमच्या एअर फोर्सच्या स्टेशनवर पहिल्यांदाच टीव्ही लावण्यात आला होता. बीबीसीवर आम्ही त्यावेळेला अनेक विमानं काबुलच्या विमानतळावर उड्डाण करताना आणि लँड करत असताना पाहत होतो. एक दिवस आम्हाला आदेश आला की आमच्या तुकडीला दिल्लीला जायचं आहे आणि हवाई दलाच्या मुख्यालयात आमचं ब्रिफींग होणार होतं. तिथे पोहचल्यानंतर आम्हाला अफगाणिस्तानात एका रेस्क्यू ऑपरेशनसाठी जावं लागणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यावेळी आम्हाला सांगितलं की आपलं अंतिम स्थळ हे मजार-ए-शरिफ आहे. त्यावेळी जो व्यक्ती आम्हाला ब्रिफींग देत होता त्याला मजार ए शरिफ हे ठिकाण नकाशावर नीट दाखवता येत नव्हतं. त्या काळात सध्याच्या जमान्यातील जीपीएस आणि इतर अद्ययावत यंत्रणा मदतीला नसायच्या.”

या रेस्क्यू ऑपरेशनसाठी हवाई दलाच्या दोन खास विमानांची निवड करण्यात आली. ज्यात राजेश कुमार हे पहिल्या विमानातील तुकडीचं नेतृत्व करत होते, तर दुसरं विमान हे १५ मिनीटांनी आकाशात झेपावलं. दिल्लीतून उड्डाण केल्यानंतर भारतीय विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला. आपल्या आयुष्यातला तो पहिलाच प्रसंग असल्यामुळे त्यावेळी खूप उत्साह वाटत असल्याचं राजेश कुमार सांगत होते. पाकिस्तानची हद्द ओलांडून ज्यावेळी आम्ही अफगाणिस्तानात शिरलो त्यावेळी आम्हाला काबूलवरुन एकही फ्रिक्वेन्सी मिळेनाशी झाली. याआधी आम्हाला रेडीओवर अशा प्रकारची शांतता ऐकायला येणं असं कधीच झालं नव्हतं. आम्ही काबूल एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यातही आम्हाला अपयश आलं.

यानंतर आम्हाला समजलं की काबूलचं ATC हे नष्ट झालं होतं, म्हणूनच आम्हाला रेडीओवर कोणताही संदेश किंवा फ्रिक्वेन्सी मिळत नव्हती. त्यावेळी अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात युद्ध सुरु होतं, तालिबानी अतिरेकी अमेरिकेकडून मिळालेल्या मिसाईलच्या द्वारे विमानांवर हल्ला करत होते. त्यावेळी आमच्या विमानात अँटी मिसाईल प्रणाली होती…परंतू त्या परिस्थितीत जर एखादी मिसाईल आमच्या दिशेने आली असती तर आपली अँडी मिसाईल प्रणाली कितपत कामाला आली असती याबद्दल मला शंका होती. त्यावेळी वातावरण खूप स्वच्छ होतं. हिंदुकुश पर्वतरांगांमधून दिसणारं दृष्य हे खरंच विलोभनीय होतं. आम्ही हिंदुकुश पर्वतरांगा ओलांडल्यानंतर मजार ए शरिफच्या दिशेने निघालो आणि पहिल्यांदा आम्हाला रेडीओवर फ्रिक्वेन्सी मिळाली. आम्ही मझार ATC शी संपर्क साधला, त्यावेळी जो कंट्रोलर तिकडे बसला होता त्याला इंग्लिश बोलता येत नव्हतं. त्यामुळे कसंबसं आम्ही त्याला आमचं म्हणणं पटवून देऊ शकलो, राजेश कुमार आपला अनुभव सांगत होते.

त्यावेळेचा प्रसंग मला अजुनही आठवतोय, “आम्ही साधारण १८ हजार फूट वर होतो आणि खाली ढगांची एवढी चादर होती की आम्हाला धावपट्टी दिसत नव्हती. शेवटी आम्ही कसेबसे हे अंतर ९ हजार फूटापर्यंत आणलं आणि त्यावेळी आम्हाला विमानतळावरची धावपट्टी दिसायला लागली.” राजेश कुमार यांचं विमान मजार-ए-शरिफ ला लँड झाल्यानंतर त्यावेळी जनरल राशिद यांच्या गटाशी त्यांची भेट झाली. राशिद यांनी गळाभेट करत राजेश कुमार यांचं स्वागत केलं.

त्यावेळी तालिबानी अतिरेकी गट हा काबूलच्या दिशेने कूच करत होता. याची माहिती कळाल्यानंतर अनेक देशांच्या राजदूतांमध्ये आपल्याला रेस्क्यू कधी केलं जाईल याबद्दलची चलबिचल सुरु झाली होती. त्यावेळी आम्हाला कळलं की भारताचे अफगाणिस्तानतले तत्कालिन राजदूत विजय नाम्बियार हे आमच्यासोबत परतणार असल्याचं कळलं. त्यावेळी श्री. सूर्या गंगाधरन हे एकमेव पत्रकार आमच्यासोबत होते आणि या प्रवासात त्यांनी हे सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद करुन ठेवले. सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित विमानापर्यंत आणल्यानंतर आमच्या लक्षात आलं की एका विमानाच्या Auxiliary Power Unit मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं आम्हाला लक्षात आलं. त्यावेळी आमच्या सुदैवाने जनरल राशिद यांनी त्यांच्या रशियन विमानातला पार्ट आम्हाला वापरण्यासाठी दिला. परंतू हा पार्ट बदलण्यासाठी बराच वेळ लागणार होता, त्यामुळे आम्हाला त्या युद्धजन्य परिस्थितीत ती रात्र तिकडेच काढायची होती. त्यावेळी संपर्कयंत्रणा इतकी खराब होती की आम्ही दिल्लीला आणि आमच्या परिवाराला या बदललेल्या प्लानविषयी माहिती देऊ शकलो नाही असंही राजेश कुमार यांनी सांगितलं.

दरम्यानच्या काळात राजदूत नाम्बियार यांनी भारतावरुन मदत आली आहे आणि ज्यांना परत जायचं आहे त्यांनी मजार-ए-शरिफला पोहचावं असा मेसेज पाठवला. या सर्वांची बसण्याची व्यवस्था मग जनरल रशिद यांच्या एका ठिकाणावर करण्यात आली जे विमानतळापासून ३०-४० किलोमीटकर अंतरावर होतं. जनरल रशिद यांच्या ठिकाणावर जात असताना संपूर्ण रस्त्यावर स्थानिक फुटीरतावादी गटाची लोकं हातात रशियन बनावटीच्या अद्ययावत बंदुका घेऊन तैनात होती. टँक, आर्टिलरी गन्स, लष्करी वाहनं असा फौजफाटा त्यावेळी मजार ए शरिफच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना पार्क करण्यात आला होता अशी आठवण राजेश कुमार यांनी मुंबई तक शी बोलताना सांगितली.

त्या प्रवासादरम्यान राजेश कुमार यांच्या बसमध्ये एक १६ वर्षाचा अफगाणी मुलगा हातात बंदूक घेऊन सुरक्षेसाठी उभा होता. जेव्हा जेव्हा बस रस्त्यात खड्ड्यांमध्ये आपटायची त्यावेळी त्या मुलाची बंदूक माझ्या दिशेने रोखली जायची…राजेश कुमार हसत हसत बोलत होते. त्या मुलाचं हास्य आजही आपल्या डोक्यात कायम असल्याचं राजेश कुमार सांगतात. अखेरीस जनरल रशिद यांच्या ठिकाणावर पोहचल्यानंत भारतीयांच्या जीवात जीव आला. त्यावेळी भारतीयांची बडदास्त ठेवण्यासाठी जनरल राशिद यांनी खास जेवणाची सोय केल्याचंही राजेश कुमार यांनी आवर्जून सांगितलं.

आम्ही अफगाणिस्तानला जाण्याआधी दिलेल्या ब्रिफींगमध्ये आम्हाला मेडीकल सुविधा आणि औषधं पुरवण्याचं काम होतं. परंतू अफगाणिस्तानच पोहचल्यानंतर हे काम रेस्क्यू मिशनमध्ये परिवर्तित झालं. रेस्क्यू साठी आलेल्या भारतीयांचा आकडा पाहून काही क्षणांसाठी आम्हालाही धक्का बसल्याचं राजेश कुमार यांनी सांगितलं. हवाई दलात किंवा कोणत्याही सैन्यदलात जवानांना रेस्क्यू मिशनमध्ये एकही माणूस मागे राहता कमा नये हे शिकवलं असतं. परंतू विमानाची क्षमता आणि उपस्थित जमाव पाहता सुरुवातीला हे काम कसं होईल याबद्दल आम्ही साशंक होतो, परंतू नंतर आम्ही ही जोखील घ्यायची असं ठरवलं. त्यावेळी विमानातली परिस्थिती ही दिल्लीमधल्या एका सरकारी बससारखी झाल्याचंही राजेश कुमार यांनी सांगितलं.

त्यावेळी अन्य देशांचे काही राजदूत आणि कर्मचारी आमच्यासोबत होते. त्यांना घेऊन आम्ही अफगाणिस्तान सोडलं, भारतात दाखल झाल्यानंतर सर्व देशांच्या राजदूताचे अधिकारी आपल्या लोकांना घेण्यासाठी आले होते. भारतीय हवाई दलाने केलेल्या त्या रेक्स्यू ऑपरेशनं सर्वांनी कौतुक केलं. आताची परिस्थिती पाहता आपले जुने दिवस पुन्हा एकदा आठवल्याचं राजेश कुमार यांनी सांगितलं.

    follow whatsapp