उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिलेल्या कामांना स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच भडकले. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या काळातील निर्णयाचा हवाला देत आरसा दाखवला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी समोरासमोर आले.
ADVERTISEMENT
‘आमच्या सात टर्म झाल्या…’ अजित पवार पवार भडकले
विधानसभेत कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुद्दा उपस्थित केला. पवार म्हणाले, ‘आज प्रश्नोत्तराचा तास आहे, याची मला जाणीव आहे. आम्ही सगळेजण सर्वांची कामं होण्यासाठी येतो. सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या काळात बजेटमध्ये जी कामं मंजूर झाली होती. त्याला वरच्या आणि खालच्या सभागृहाने मान्यता दिली होती. त्या सगळ्या कामांना विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि इतर मित्र पक्षांची सर्व कामं थांबवली.’
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘लोकशाही मार्गाने मी स्वतः मुख्यमंत्र्यांना (एकनाथ शिंदे) भेटलो विरोधी पक्षनेता म्हणून. आमच्यातील अनेकजण भेटले. समोर उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) बसले आहेत, त्यांच्याकडे अर्थ खातं आहे. त्यांना भेटलो. सरकार येतात आणि जातात. आमच्या सात सात टर्म झाल्या आहेत. मनोहर जोशीचं सरकार बघितलं. राणे साहेबांचं सरकार आम्ही बघितलं. वेगवेगळी सरकारं आम्ही बघितली. देवेंद्रजी, तुमचंही सरकार आम्ही पाच वर्ष बघितलं. पण, मंजूर झालेली कामं कधी थांबली नव्हती. ही महाराष्ट्रातील कामं आहेत. ही काही कर्नाटक, गुजरात, तेलंगानाची कामं नाहीत. मला बोलू द्या. आम्हाला माहितीये की प्रश्नोत्तराचा तास आहे,’ असं म्हणत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘तुमच्याकडूनच शिकलो’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना उत्तर दिलं. ‘विरोधी पक्षनेत्यांनी (अजित पवार) जो मुद्दा मांडला… हे खरंय की तुम्ही सात-सात वेळा निवडून आलात. आम्ही कमी वेळा निवडून आलो. पण, काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी आमची सर्व कामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं,’ असं प्रत्युत्तर फडणवीसांनी अजित पवारांना दिलं.
‘माझ्या स्वतःच्या मतदारसंघातील कामं ही त्यावेळी तुम्ही रोखली होती. सगळ्यांच्या मतदारसंघातील कामं तुम्ही रोखली होती. अडीच वर्ष भाजपच्या लोकांना नवा पैसा तुम्ही दिला नाही. आम्ही बदल्याची भावना ठेवणारे लोक नाही. त्यामुळे ज्या काही स्थगित्या दिल्या होत्या, त्यातल्या 70 टक्के स्थगित्या उठवण्यात आल्या आहेत. 30 टक्के स्थगिती या करिता ठेवलीये की, शेवटच्या काळात वाटप करताना तरतुदींचा कुठलाही नियम पाळण्यात आलेला नाही. जिथे 2 हजार कोटींची तरतूद आहे. तिथे 6 हजार कोटी वाटले आहेत. ते पैसे आणायचे कुठून? आमदनी अठन्नी, खर्चा रुपया अशी अवस्था असेल, तर तशा प्रकारे हे बजेट मंजूर होईल,’ असं म्हणत फडणवीसांनी पवारांना उत्तर दिलं.
‘तुम्ही जरी आमच्यावर अन्याय केला असला, तरी आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही. आवश्यक त्या स्थगित्या उठवल्या आहेत. जिथे तरतुदी जास्त आहेत, त्या स्थगिती ठेवल्या आहेत. त्याही संदर्भात योग्य निर्णय घेऊ. सत्तारुढ पक्ष आणि विरोधी पक्ष असा भेदभाव ठेवणार नाही. कुणावरही अन्याय करण्याचं कारण नाही,’ असा टोलाही फडणवीसांनी अजित पवारांना लगावला.
ADVERTISEMENT