मुंबईत सोमवारी शेतकऱ्यांचा मोर्चा पार पडला. महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या भागातून हजारो शेतकरी त्यात सहभागी झाले होते. राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळ भेट न घेण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यात माध्यमाशी बोलताना राज्यपालांवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
अजित पवार म्हणाले की, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे राज्यपाल भेटू शकणार नाही अशी माहिती मला मिळाली. मात्र अशावेळी इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कार्यक्रम थोडा बदलायचा होता. कोणाला प्राधान्य द्यायचे हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.
याशिवाय जयंत पाटील यांच्या दौ-यासंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, इतर पक्षांच्या नेत्याप्रमाणे जयंत पाटील यांचे दौरे सुरू असून पक्षबांधणीच्या दृष्टीने दौरे केले जात आहेत. शिवाय, सांगली कोल्हापूरमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीमधील नेत्यांवर गुन्हे दाखल केले गेले. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचे लोक असूदेत…आंदोलन करत असताना जे नियम अटी घालून दिलेल्या असतात त्यांचे पालन केले नाही तर पोलिसांना नाईलाजाने गुन्हे दाखल करावे लागतात.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला न भेटल्याने त्यांच्यावर चहू बाजूंनी टीका होत आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणी संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. या आंदोलनासाठी राज्याच्या निरनिराळ्या भागातून हजारो शेतकरी एकटवले होते. आझाद मैदानात सभा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून निवेदन देणार होतं. मात्र राज्यपाल राजभवानात उपस्थित नव्हते, त्यामुळे ही भेट होऊ शकली नाही.
ADVERTISEMENT