मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये तापलेल्या सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत बैठक घेतली. अमित शाह यांच्या या शिष्टाईचं राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी स्वागत केलं. तिथं जे काही ठरलं आहे त्याप्रमाणे व्हावं आणि मंत्र्यांच्या समितीमधून चांगलं पुढं यावं, अशी अपेक्षा व्यक्त करत अजित पवार आणि आपली भूमिका स्पष्ट केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
ADVERTISEMENT
हरीश साळवेंची नियुक्ती व्हावी :
यावेळी अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मोठी मागणी केली. अजित पवार म्हणाले, ज्याप्रमाणे कर्नाटकने सीमाप्रश्नाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांची नियुक्ती केली आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्राचीही बाजू चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी सरकारने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची नियुक्ती करावी.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांंमुळे वाद वाढला :
कारण नसताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा वाद निर्माण केला, त्यांनी कशा प्रकारची वक्तव्य केली नसती तर हे मुद्देच पुढे आले नसते आणि वातावरण पण खराब झालं नसतं. गाड्यांची जी काही तोड-फोड झाली किंवा काळ फासलं किंवा काही मराठी भाषिकांना त्रास झाला तो पण त्रास झाला नसता. या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्रातीलही वेगवेगळ्या सीमाभागातील गावांमध्ये मत प्रदर्शित झालं आणि आमचा विकास झाला नाही तर आम्ही जाणार अशा प्रकारची भावना वाढीला लागली, जी आपल्या राज्याच्या दृष्टीने पण अडचणीची आहे.
दोन्ही बाजूंनी जे ठरलं ते होणं गरजेचं :
कर्नाटकने एकंदरीत सामंजस्याची भूमिका घेतली असं दिसतं आहे. अर्थात तिथं जे ठरलंय त्याची कृती मात्र दोघांकडून म्हणजे महाराष्ट्राकडूनही आणि कर्नाटकाकडूनही झाली पाहिजे. त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ देता कामा नये आणि त्यातून शांततामय वातावरण सीमाभागात झालं पाहिजे. त्या करता सगळ्यांनी कबूल केल्याप्रमाणे वागले पाहिजे.
बैठकांमधून चांगलं निघावं ही मनापासूनची भावना :
समित्यांच्या बैठकांमधून चांगलं निघावं ही आमची मनापासूनची भावना आहे. त्याकरता आम्ही शुभेच्छा पण देऊ. पण आजपर्यंतचा इतक्या वर्षाचा अनुभव आणि इतक्या दिग्गज माणसांनी आतापर्यंत प्रयत्न केला. त्याच्यातले काही दिग्गज व्यक्ती तर आज आपल्यात हयात नाहीत. परंतु त्यांना काही आजपर्यंत यश आलं नव्हतं. पण ज्या काही समित्या अधिकारी आणि मंत्री महोदयांच्या केल्या त्याच्यातून चांगलं बाहेर यावं ही आमची अपेक्षा आहे.
ADVERTISEMENT