सीरम इन्स्टिट्युटला लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे होती असा अहवाल माझ्याजवळ आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला 21 जानेवारीला भीषण आग लागली. सीरमच्या इमारतीतील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती जी नंतर पाचव्या मजल्यापर्यंत पोहचली.
ADVERTISEMENT
मांजरी या ठिकाणी असलेल्या 100 एकर भागातल्या या एका इमारतीला ही आग लागली होती. ही आग लागल्यानंतर हा अपघात आहे की घातपात? अशीही एक चर्चा सुरू झाली होती. मात्र आता या आगीमागचं कारण अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे समोर आलं आहे. सीरम इन्स्टिट्युटला लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे होती असा अहवाल माझ्याकडे आला असल्याचं त्यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
सीरम इन्स्टिट्युटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. 21 जानेवरीला ही घटना घडली होती. सुरुवातीला जेव्हा या आगीची बातमी आली त्यावेळी कोरोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या प्रकल्पालाच आग लागली का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र ही आग कोरोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या प्रकल्पाला लागली नव्हती तर बीसीजी लस बनवणाऱ्या प्रकल्पाला लागली होती अशी माहिती या सीरमेचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली. ही आग इतकी भीषण होती की ती आटोक्यात येण्यासाठी सुमारे पाच तास लागले होते.या आगीत कोट्यवधींचं नुकसान झाल्याची माहिती अदर पुनावाला यांनी दिली.
ADVERTISEMENT