अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वाघम्बरी मठामध्ये नरेंद्र गिरी यांचा मृतदेह आढळला आहे. असं सांगितलं जातं आहे की त्यांच्या खोलीतून सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी शिष्य आनंद गिरी यांच्यावर त्रास देण्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र गिरी महाराजांचा मृत्यू होणं ही अध्यात्मिक जगताची फार मोठी हानी आहे या आशयाचं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी असं म्हटलं आहे की, ‘मला यावर विश्वासच बसत नाही की नरेंद्र गिरी महाराजांनी आत्महत्या केली असावी, मी स्तब्ध आहे, निशःब्द आहे. ‘ समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी असं म्हटलं आहे की नरेंद्र गिरी महाराजांचा निधन ही खूप मोठी हानी आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या अनुयायांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो..
समाजवादी पक्षाचे आणखी एक नेते रामगोपाल यादव यांनीही या घटनेबाबत अतीव दुःख व्यक्त केलं आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यू ही घटना अत्यंत दुःखद आहे. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला याची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी यादव यांनी केली आहे.
अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी महाराज यांनीही नरेंद्र गिरी महाराज यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. सनातन धर्माचं हे खूप मोठं नुकसान आहे. याशिवाय अयोध्येतील हनुमान गढी चे महंत राजू दास यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT