सचिन वाझेंनी जे काही पत्र पाठवल्याचं समोर आलं आहे त्या पत्रासह सगळ्याच पत्रांची चौकशी CBI मार्फत करण्यात यावी अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केलं आहे. जी काही पत्रं समोर येत असतील त्याची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आणि सत्य बाहेर आलं पाहिजे. जर सत्य बाहेर आलं नाही तर सरकारची प्रतिमा डागाळतच राहिल ती काही सुधारणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
तुरुंगातल्या लोकांकडून पत्र लिहून घेण्याची फॅशन महाराष्ट्रात आली आहे-संजय राऊत
काय आहे प्रकरण?
सचिन वाझे यांनी लिहिलेलं पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागलं आहे. या कथित पत्रात त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब आणि दर्शन घोडावत यांच्यासह अजित पवारांची नावं घेतली आहेत. अजित पवारांचं नाव घेऊन दर्शन घोडावत यांनी आपल्याला कोट्यवधींची वसुली करण्यास सांगितल्याचं या पत्रात सचिन वाझेंनी म्हटलं आहे. तसंच अनिल देशमुख आणि अनिल परब या दोन्ही मंत्र्यांनीही आपल्याला कोट्यवधींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचंही सचिन वाझे यांनी आपल्या कथित पत्रात म्हटलं आहे. हे पत्र एनआयए कोर्टाने स्वीकारलं नाही. कन्फेशन द्यायचं असेल तर त्याची एक पद्धत असते. त्या अनुषंगाने हे पत्र तुम्ही लिहिलेलं नाही असं कोर्टाने सचिन वाझेंना सांगितलं आहे आणि हे पत्र स्वीकारण्यास नकार दिला आहे.
बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो वाझेने केलेले आरोप धादांत खोटे: अनिल परब
हे पत्र समोर येताच परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सचिन वाझेंच्या कथित पत्रात लावण्यात आलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. सचिन वाझेंनी केलेले सगळे आरोप निखालस खोटे आहेत. यामागे भाजपचं षडयंत्र आहे कारण दोन दिवस आधीपासून भाजप नेते हे म्हणत होते की आता तिसऱ्या मंत्र्याची विकेट जाणार. माझंही नाव काही लोकांनी घेतलं त्यामुळे भाजपला सचिन वाझेंच्या पत्राची कुणकुण लागली होती हेही स्पष्ट होतं आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा हेतू यामागे दिसून येतो आहे. या पत्रात लावण्यात आलेला एकही आरोप खरा नाही. मी बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो की हे सगळे आरोप खोटे आहेत असं अनिल परब यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
ADVERTISEMENT