देशात कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. लसीकरण कार्यक्रमाला अधिक गती देण्यासाठी सरकारने आणखी दोन लसींचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिली आहे. यासोबतच औषधाच्या वापरालाही हिरवा सिग्नल देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
केंद्र सरकारने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा देशात कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण हे वेगाने वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने कोवोव्हॅक्स आणि कोर्बिव्हॅक्स या दोन कोरोना लसी तसेच विषाणूविरोधी औषध Molnupiravir च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.
ड्रग्स कंट्रोलरने सोमवारी मंजूर केलेल्या दोन कोरोना लसींपैकी पहिली लस कोर्बिवॅक्स (Corbevax) आहे. जी हैदराबादस्थित फार्मा कंपनी बायोलॉजिकल-ई (Biological-E) ने बनवली आहे. कोरोनावरील ही तिसरी स्वदेशी लस आहे. त्याच वेळी, दुसरी लस कोवोव्हॅक्स(Covovax) आहे, जी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे द्वारे तयार केली जात आहे. कोवोव्हॅक्स अमेरिकन कंपनी नोव्हावॅक्सने बनवलं आहे. ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग पुण्यातील सीरम कपंनी करत आहे.
तर देशातील 13 कंपन्या कोरोनावरील औषध Molnupiravir चे उत्पादन करणार आहेत. ज्याचा वापर कोरोनाच्या प्रौढ रुग्णांवर केला जाणार आहे. याचा वापर आता फक्त त्या रुग्णांवर केला जाईल ज्यांना जास्त धोका असेल.
सरकारच्या या निर्णयाचे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले की, क्लिनिकल चाचण्यांमध्ये कोवोव्हॅक्सची कोरोनाविरुद्धची कार्यक्षमता 90 टक्क्यांहून अधिक आहे.
मोठी बातमी! 3 जानेवारीपासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस
आतापर्यंत, भारत बायोटेकचे कोव्हॅक्सिन, सिरम इन्स्टिट्यूटचे कोव्हिशील्ड, रशियाचे स्पुटनिक-व्ही, झायडस कॅडिलाचे झायकोव्ह-डी, बायोलॉजिकल-ईचे कॉर्बीवॅक्स आणि सीरम इन्स्टिट्यूटचे कोवोव्हॅक्स यांचा आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली होती. ज्यामध्ये आता आणखी दोन लसींची भर पडली आहे. यामुळे भारतातील लसीकरणाला अधिक वेग येईल.
ADVERTISEMENT