पुणे : सत्ताधारी आणि विरोधक नेते एखाद्या मुद्द्यावरुन आमने-सामने येण्याचा प्रकार अनेकदा पाहतो. मात्र आता एकाच पक्षातील दोन बडे नेते एकमेकांसमोर उभं राहिल्यांच रविवारी समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यामध्येच ट्विटरवरुन चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. दोघांनीही जाहिरपणे एकमेकांना टोले-प्रतिटोले दिले.
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक येथील समाधी स्थळी आत्मक्लेश आंदोलन केलं. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अशोक बापू पवार, अमोल मिटक, प्राजक्त तनपुरे, संदीप क्षीरसागर, नितीन पवार यांनीही उपस्थिती लावली होती. सोबत इतरही अनेक स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते
डॉ. अमोल कोल्हे अनुपस्थित :
मात्र या सर्वांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अनुपस्थितीची बरीच चर्चा रंगली. मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हे भाजपच्या जवळ जात असल्याच्या चर्चा सुरु असल्याने त्यांच्या अनुपस्थितीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर आता स्वतः अमोल कोल्हे यांनी भाजप नेत्यासोबतचा फोटो ट्विट करुन आपण आंदोलनाला का उपस्थित नव्हतो याचं कारण सांगितलं आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, काल वढू तुळापूर येथे करण्यात आलेल्या आत्मक्लेश आंदोलनाची मला पूर्वकल्पना नसल्यामुळे मी उपस्थित नव्हतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचावा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित “शिवपुत्र संभाजी” महानाट्यासंदर्भात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांची भेट घेऊन चर्चा केली, अशी माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
रोहित पवारांवर काय म्हणाले अमोल कोल्हे?
यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार रोहित पवार यांनाही खोचक टोलाही लगावला. ते म्हणाले, मतदारसंघातील “आत्मक्लेश” साठी अनुपस्थित असल्याने उगाच चर्चा करण्याची गरज नाही, कारण शिवसिंहाच्या छाव्याने ‘आत्मक्लेश’ वगैरे बाबींपेक्षा झेपावण्याला आणि ठसा उमटवण्यालाचं महत्व दिलं असतं. त्याच आदर्शांवर चालण्याचा माझा प्रयत्न आहे, असं म्हणतं रोहित पवार यांच्या आंदोलनाबाबत नकारात्मक भूमिका मांडली.
रोहित पवारांचं प्रत्युत्तर :
अमोल कोल्हे यांच्या टोल्यांना रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, प्रत्येकाची व्यक्त होण्याची एक पद्धत असते. त्यानुसारच गेल्या काही दिवसांपासून आपल्याला ऐकाव्या लागत असलेल्या अवमानकारक भाषेमुळं दुःख झाल्याने आत्मक्लेश आंदोलन केलं. या आंदोलनाची माहिती एक दिवस आधीच सोशल मिडियातून दिली होती आणि त्यासाठी आलेले सर्वच लोक हे स्वयंस्फूर्तीने आले होते.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेच्या माध्यमातून अमोल कोल्हेजी आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास लोकांपुढे आणला, याचा आम्हाला सर्वांनाच मनस्वी अभिमान वाटतो आणि आपण जी झेपावण्याची भूमिका मांडत आहात ती तर येत्या काळात आपल्या सर्वांना हाती घ्यावीच लागणार, यात शंका नाही.
शेवटी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे आणि सर्वच थोर व्यक्ती ही महाराष्ट्राची दैवतं आहेत आणि त्यांचा अवमान निमूटपणे सहन करणं हे आपल्या रक्तात असूच शकत नाही, असा प्रतिटोलाही त्यांनी लगावला.
ADVERTISEMENT