अमरावतीमध्ये (Amravati) एका पोलीस कर्मचाऱ्याने (Police Constable) गळफास घेऊन आत्महत्या (committed suicide) केली आहे. एका झाडाला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. विजय आडोकार असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना उघड झाली.
ADVERTISEMENT
विजय आडोकार यांना बदलीच्या मुद्द्यावरून मानसिक त्रास दिला गेला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विजय आडोकार यांच्या मुलाने याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तक्रारीत वलगाव पोलीस निरक्षकांनी बदलीसाठी त्रास दिला आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असंही मुलाने म्हटलं आहे.
विजय आडोकार यांचा मुलगा केतन याने तक्रारीत काय म्हटलं आहे?
माझे वडील विजय किसन आडोकार यांना आरती सिंग पोलीस आयुक्त अमरावती (शहर ) आणि वलगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजयकुमार वाळसे यांनी वलगाव स्टेशनमधून बदली न करता उलट नाहक त्रास देऊन निलंबनाच्या धमक्या दिल्या आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं. यांच्या जाचाला कंटाळून माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. यापूर्वी पोलीस विभागाकडे बदलीसाठी वारंवार विनंती अर्ज करण्यात आला. तरीही त्या अर्जावर काहीही घडलं नाही. मी आपणास विनंती करतो आहे की या दोन अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी. असं म्हणत या मुलाने तक्रार दिली आहे.
काय म्हटलं आहे पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीने?
जोपर्यंत माझ्या वडिलांना नाहक त्रास देणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचं निलंबन केलं जात नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असं त्यांच्या मुलीने म्हटलं आहे. पोलीस आयुक्त आरती सिंग आणि वलगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजयकुमार वाळसे यांनी आत्तापर्यंत अनेकांना त्रास दिला आहे. या दोघांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आडोकर यांच्या मुलीने केली आहे. तसंच आम्हाला मीडियाने साथ द्यावी असंही तिने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT