ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा हे आनंद दिघे यांचं स्वप्न होतं. जो इतिहास आपण घडवला त्यामागे आनंद दिघे यांचा आशीर्वाद आणि बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद होता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्यातल्या टेंभीनाका भागात बोलत होते. आज धर्मवीर आनंद दिघे यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी शक्ती स्थळ या ठिकाणी जाऊन आदरांजली वाहिली. त्यावेळीच त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले आहेत एकनाथ शिंदे?
धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत आपण इतिहास घडवला. जी लढाई आपण केली ती साधी सोपी नव्हती पण ती लढाई आपण जिंकलो. राज्याचा मुख्यमंत्री ठाण्याचा व्हावा हे आनंद दिघे यांचं स्वप्न होतं. अरूणाताईंनी माझं अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की आनंद दिघे म्हणायचे की एक दिवस ठाण्याचा मुख्यमंत्री होईल. ते स्वप्न आपण पूर्ण केलं. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद तुमच्या शुभेच्छांमुळे आपण जिंकलो.
आनंद दिघे यांचा गौरव करावा तेवढा कमी आहे
आनंद दिघे यांचा गौरव करावा तेवढा कमी आहे. धर्मवीर या सिनेमातून आनंद दिघे जगभरात पोहचले. मला त्या सिनेमाचा अभिमान आहे. आपलं सरकार आल्यापासून आपण विक्रमी निर्णय घेतले आहे. महिला, सामान्य माणूस, कष्टकरी, विद्यार्थी या सगळ्यांसाठी आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले. गुरूवारीच पोलिसांना घरं देण्याचा निर्णय घेतला. कारण आपलं सरकार हे सामान्यांचं सरकार आहे.
अनेकांना वाटत नव्हतं की सरकार राहिल, आत्ताही लोक बोलत आहेत की सरकार राहणार नाही. आपल्याला त्याची फिकीर नाही. आपलं सरकार आलं आहे हे अनेकांना पचलेलं नाही, गळ्याखाली उतरलेलं नाही. मात्र अधिवेशन नुकतंच पार पडलं तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलंच आहे. एकदा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आशीर्वाद असताना मला कसलीही चिंता नाही. पोटात एक आणि ओठात एक अशी आपली भूमिका नाही. जे पोटात आहे तेच ओठांवर असतं असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला.
२१ जूनला राज्यात राजकीय भूकंप झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंवर टीका करत आणि त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली हे सांगत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गेले. त्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि कोसळलं. या घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आहेत. आज ते ठाण्यात आले होते. ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा हे आनंद दिघे यांचं स्वप्न होतं याचा पुनरूच्चार एकनाथ शिंदे यांनी केला.
ADVERTISEMENT