महिंद्रा उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असणारे आनंद महिंद्र नवंनवे व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत असतात. आनंद महिंद्रा यांच्याबद्दल चर्चा करण्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेलं आदित्य ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांचं कौतुक.
ADVERTISEMENT
आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विट करत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. आदित्य ठाकरे यांनीही महिंद्रांचे आभार मानले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बस स्थानकाचा कायपालट केल्याबद्दल महिंद्राकडून कौतूक करण्यात आलं आहे. व्हिडीओ पोस्ट करताना आनंद महिंद्रा म्हणाले, “अखेर मुंबईत जागतिक दर्जाची बस स्थानकं तयार होणार आहेत. एक्सरसाईज बार आणि हिरव्या छतासारख्या नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह पाहणं खूपच सुंदर आहे. वाह, आदित्य ठाकरे आणि इक्बालसिंग चहल,” असं महिंद्रांनी म्हटलं होतं.
महिंद्रांच्या ट्विटवर आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर
आनंद महिंद्रांनी केलेलं ट्विट आदित्य ठाकरे यांनी रिट्विट केलं आहे. महिंद्रांच्या ट्विटवर आदित्य ठाकरे म्हणाले,”आनंद महिंद्रांजी आभार. आपल्या शहरांमध्ये आरामदायक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि शहरांच्या सौंदर्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याचाच यामागचा उद्देश आहे. त्यामुळे आम्ही वातानुकूलित ईलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवत आहोत, त्यामुळे नागरिकांसाठी सर्व बस स्थानकंही चांगली असतील, याकडे लक्ष देत आहोत,” असं आदित्य ठाकरे यांनी महिंद्रांचे आभार मानताना म्हटलं आहे.
आनंद महिंद्रांचं हे ट्विट @csankush111 या यूजरने रिट्विट केलं आहे. त्याने म्हटलं आहे की, एक्सरसाईज बार ठिक आहे, पण ग्रीन छताबद्दल मी सहमत नाही. याला पाणी कोण घालणार आणि त्याची देखरेख करण्याचं काम कोण करणार? या छतावर सोलर पॅनल लावले असते, तर वीज निर्मिती झाली असती. त्यामुळे ईलेक्ट्रिक बिलबोर्ड चालवता आले असते. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळालं असतं.”
आनंद महिंद्रांनी त्यालाही उत्तर दिलं आहे. “चांगला प्रश्न आहे. मी सुद्धा हा प्रश्न विचारला होता. गार्डनच्या आजूबाजूला असणाऱ्या बस स्थानकांवरच हिरवे छत आणि एक्सरसाईज बार असतील कारण हे ओपन स्पेसमध्ये आहे. जिथं शक्य असेल, तिथे छतावर सोलर पॅनल लावले जातील. बस स्थानक स्वच्छ राहावीत हाच याचा मुख्य उद्देश आहे,” असंही महिंद्रांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT