Andheri bypoll : ऋतुजा लटकेंसह सात उमेदवार रिंगणात, पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

मुंबई तक

03 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:41 AM)

रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणूक होत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे. Andheri by poll 2022 : पोटनिवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार […]

Mumbaitak
follow google news

रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणूक होत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

Andheri by poll 2022 : पोटनिवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार

ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी -पीपल्स)

मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

नीना खेडेकर (अपक्ष)

फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

मिलिंद कांबळे (अपक्ष)

राजेश त्रिपाठी (अपक्ष)

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या

पुरुष मतदार : १ लाख ४६ हजार ६८५

महिला मतदार : १ लाख २४ हजार ८१६

तृतीय पंथीय मतदार : १ (एक)

एकूण मतदार : २ लाख ७१ हजार ५०२

सेवा मतदार (Service Electors) : २९

दिव्यांग मतदार : ४१९

– ‘८० पेक्षा अधिक वय असणारे नागरिक’ या वर्गवारीतील ४३० मतदारांनी घरुन मतदान करण्यास सहमती दिली. त्यानुसार ३९२ मतदारांबाबत मतदान घरुन करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आलीये. एकूण मतदान केंद्रं २५६ असून, ही मतदान केंद्रं ३८ ठिकाणी कार्यरत असणार आहेत.

-२५६ मतदान केंद्रांपैकी २३९ मतदान केंद्रे ही तळ मजल्यावर असून उर्वरित १७ मतदान केंद्रे ही पहिल्या मजल्यावर आहे. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सर्व ठिकाणी ‘व्हिल चेअर’ची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.

सखी मतदान केंद्र : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंधेरी पूर्व विधानसभा परिसरातील मरोळ मरोशी मार्गावर असणाऱ्या ‘मरोळ एज्युकेशन अकादमी हायस्कूल’ येथे असणारे ‘मतदान केंद्र क्रमांक ५३’ हे सखी मतदान केंद्र म्हणून उभारण्यात आलं आहे. या मतदान केंद्रामध्ये एकूण १ हजार ४१८ मतदार असून, यापैकी ७२६ महिला; तर उर्वरित ६९२ मतदार हे पुरुष आहेत. या केंद्रातील महिला मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याने हे मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आलंय. या मतदान केंद्रामध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी महिला असणाार आहेत.

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट : मतदान प्रक्रियेसाठी ३३३ कंट्रोल युनिट, ३३३ बॅलेट युनिट व ३५९ व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणली जाणार आहेत.

मतदान विषयक यंत्र सामुग्री व संबंधित मनुष्यबळ वाहून नेण्यासाठी आवश्यक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रक्रियेवर या अधिकाऱ्यांचं असणार लक्ष

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ३ केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी देवेश देवल, भारतीय पोलिस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी प्रविण कोया आणि भारतीय राजस्व सेवेतील ज्येष्ठ अधिकारी सत्यजित मंडल यांचा समावेश आहे.

प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी साधारणपणे १ हजार ६०० कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे. त्याचबरोबर मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था सुयोग्य प्रकारे राहावी, यासाठी सुमारे १ हजार १०० इतके अधिकारी-कर्मचारी कार्यरत असणार आहे. यामध्ये मुंबई पोलीस दल, राखीव पोलीस दल, निमलष्करी दल, गृह रक्षक दल तैनात असणार आहे.

    follow whatsapp