अंगडीया खंडणी प्रकरण : DCP सौरभ त्रिपाठी निलंबीत, गृह विभागाची कारवाई

मुंबई तक

• 06:05 AM • 22 Mar 2022

– देव कोटक, मुंबई प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या अंगडीया व्यवसायिकांकडून खंडणी गोळा करण्याच्या प्रकरणात राज्य सरकारने पहिली मोठी कारवाई केली आहे. खंडणी वसूल करण्याचे आरोप असलेल्या DCP सौरभ त्रिपाठी यांना राज्याच्या गृह विभागाने निलंबीत केलं आहे. DCP सौरभ त्रिपाठी यांना मुंबई पोलिसांनी फरार घोषित केलं असून त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. काय […]

Mumbaitak
follow google news

– देव कोटक, मुंबई प्रतिनिधी

हे वाचलं का?

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या अंगडीया व्यवसायिकांकडून खंडणी गोळा करण्याच्या प्रकरणात राज्य सरकारने पहिली मोठी कारवाई केली आहे. खंडणी वसूल करण्याचे आरोप असलेल्या DCP सौरभ त्रिपाठी यांना राज्याच्या गृह विभागाने निलंबीत केलं आहे. DCP सौरभ त्रिपाठी यांना मुंबई पोलिसांनी फरार घोषित केलं असून त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

काय आहे हे प्रकरण?

रोख रक्कम, सोनं-चांदी यासह हिरे आदी गोष्टी एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या मुंबईतील अंगडिया असोसिएशनने मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी करत त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. खंडणी मागितली जात असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर दक्षिण मुंबई विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी १८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल गेला होता.

सौरभ त्रिपाठींचं नाव कसं आलं समोर?

या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर अटक करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्यासह पोलीस अधिकारी नितीन कदम आणि समाधान जमदाडे यांचा समावेश आहे. दरम्यान, या खंडणीच्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाकडे देण्यात आला. यावेळी ओम वंगाटे यांच्या चौकशीतून या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार सौरभ त्रिपाठी असल्याचं समोर आलं.

या प्रकरणात त्रिपाठी यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्याकडून Zone 2 चा चार्ज काढून घेण्यात आला आणि त्यांच्याकडे Operations विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. परंतू गुन्हा दाखल झाल्यापासून सौरभ त्रिपाठी हे फरार आहेत.

आतापर्यंत गुन्हे शाखेने काय कारवाई केली?

तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या अटकेसोबत गुन्हे शाखेने सौरभ त्रिपाठी यांच्या जवळच्या व्यक्तीला लखनऊमधून अटक केली आहे. हा व्यक्ती सौरभ त्रिपाठी यांच्यासाठी हवालाच्या पैशांची देवाण-घेवाण पहायचा. मुंबईतील अंगडीयांकडून मिळालेला पैसा डीसीपी त्रिपाठी हवालाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशला पाठवायचे अशी माहिती समोर येते आहे.

याव्यतिरीक्त मुंबई पोलिसांनी डीसीपी त्रिपाठी यांच्या लखनऊ येथील घरात काम करणाऱ्या नोकरालाही या प्रकरणात अटक केली आहे. पप्पूकुमार प्यारेलाल असं या नोकराचं नाव असून त्रिपाठी हवालामार्फत पाठवत असलेले पैसे पप्पूपर्यंत पोहचायचे असं पोलिसांना समजलं. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान त्यांना पप्पूकडे दीड लाखांची रक्कम सापडून आली.

    follow whatsapp