जावईबापू रुसले…रागाच्या भरात विजेच्या टॉवरवर जाऊन बसले! जाणून घ्या कुठे घडला हा प्रकार?

मुंबई तक

• 03:25 PM • 31 Jul 2021

असं म्हणतात की लग्नघरात जावईबापूंची मर्जी सांभाळण्यासाठी मुलीच्या घरची मंडळी अक्षरशः धावपळ करत असतात. लग्नानंतरही जावईबापूंना विशेष मान असतो. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यामध्ये भराडखेडा गावात रुसलेल्या जावईबापूंची मनधरण करताना सासरच्या मंडळींना चांगलीच तारेवर कसरत करावी लागली. बायकोसोबत झालेल्या किरकोळ वादातून जावईबापू रुसून बसले आणि थेट विजेच्या टॉवरवर जाऊन बसले. मंगेश शेळके असं या जावईबापूंचं नाव […]

Mumbaitak
follow google news

असं म्हणतात की लग्नघरात जावईबापूंची मर्जी सांभाळण्यासाठी मुलीच्या घरची मंडळी अक्षरशः धावपळ करत असतात. लग्नानंतरही जावईबापूंना विशेष मान असतो. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यामध्ये भराडखेडा गावात रुसलेल्या जावईबापूंची मनधरण करताना सासरच्या मंडळींना चांगलीच तारेवर कसरत करावी लागली. बायकोसोबत झालेल्या किरकोळ वादातून जावईबापू रुसून बसले आणि थेट विजेच्या टॉवरवर जाऊन बसले.

हे वाचलं का?

मंगेश शेळके असं या जावईबापूंचं नाव असून पत्नीसोबत झालेल्या किरकोळ भांडणानंतर त्याने रागाच्या भरात विजेच्या टॉवर जाऊन बसायचं ठरवलं. ज्यावेळी गावकऱ्यांना ही गोष्ट लक्षात आली, त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जावईबापूंना खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, मनधरण्या सुरु झाल्या. पण जावईबापू काहीकेल्या खाली उतरायला मागेनात.

हा हायवोल्टेज ड्रामा तब्बल चार तास सुरु होता. संध्याकाळी सहा वाजता गावातला वीजपुरवठा पूर्ववत होणार होता, परंतू तरीही जावई खाली उतरायला तयार होत नाही म्हणल्यावर गावकऱ्यांसह मुलीकडच्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली. अखेर पोलीस पाटलांनी या प्रकरणात मध्यस्थी करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरु न करण्याची विनंती केली.

जावई बापूंच्या काकांना बोलावून त्यांना मध्यस्थी करत जावयांची समजूत काढण्यास सांगण्यात आलं.अखेरीस काकांनी समजूत काढून सगळे वाद मिटवून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर जावईबापू खाली उतरायला तयार झाले. कौटुंबिक वादातून सासऱ्यांनी मर म्हटल्यामुळे आणि बायको साथ देत नसल्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचं मंगेश शेळके यांनी सांगितलं. कालांतराने हा वाद इथेच शमला परंतू दिवसभर गावात जावईबापूंच्या या हायवोल्टेज ड्रामाची चर्चा सुरु होती.

    follow whatsapp