राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते आहे. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित कऱण्यात आलं आहे. माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेने दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने स्वीकारला आहे.
ADVERTISEMENT
मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख हे कोठडीत आहेत. १ नोव्हेंबर २०२१ ला ते ईडीसमोर हजर झाले त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र गेल्या वर्षी मार्च महिन्यात लिहिलं होतं. त्यात त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर दोन प्रमुख आरोप केले होते. त्यातला पहिला आरोप होता तो म्हणजे अनिल देशमुखांनी सचिन वाझेला मुंबईतल्या बार आणि रेस्तराँमधून १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. तसंच ते पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या यामध्ये ढवळाढवळ करतात.
परमबीर सिंग यांनी जो लेटरबॉम्ब टाकला त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं, त्यानंतर सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले. ज्यानंतर अनिल देशमुख यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात राजीनामा दिला होता. या सगळ्या प्रकरणी मनसुख हिरेन प्रकरणात हात असलेला सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला आहे त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सचिन वाझेने जो अर्ज केला होता त्यात कथित भ्रष्टाचार साक्षीदार होण्याची तयारी त्याने दर्शवली होती. त्यासाठी सचिन वाझेने विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सीबीआयने या अर्जाला सशर्त मंजुरी दिली. यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT