राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या घरासह विविध ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी छापेमारी केली. जवळपास १३ ते १४ तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल परबांची चौकशी केली. या चौकशीनंतर परब यांनी माध्यमांना कारवाईच्या कारणाबद्दल खुलासा केला.
ADVERTISEMENT
ईडीने गुरूवारी (२६ मे) अनिल परब यांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानासह दापोली, पुणे या ठिकाणी छापेमारी केली. सकाळी सुरू झालेली कारवाई सायंकाळी उशिरा संपली. या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अनिल परब यांच्या जवळच्या लोकांचीही चौकशी करण्यात आली.
परिवहन मंत्री अनिल परब हे एका रिसॉर्टमुळे कसे अडकत गेले? वाचा सविस्तर बातमी
ईडीच्या वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी केली. छापेमारी दरम्यान ईडीकडून अनिल परब यांचीही चौकशी करण्यात आली. मुंबईतील कारवाई संपल्यावर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी कारवाईबद्दल प्रतिक्रिया दिली.
अनिल परब नेमकं काय म्हणाले?
‘ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या शासकीय निवासस्थानी, मी राहतो त्या घरावर माझ्याशी संबंधित काही लोकांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. गेल्या काही दिवसांपासून या बातम्या सतत येत होत्या. ईडीची कारवाई होणार अशा बातम्या सतत येत होत्या.’
‘यामागचा गुन्हा काय? हे लक्षात आलं की दापोलीतील साई रिसॉर्ट. मी पहिल्या दिवसापासून सांगितलं आहे की साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत. त्याची सगळी माहिती देण्यात आली आहे,’ असंही परब म्हणाले.
‘हे रिसॉर्ट अजून बांधून झालेलं नाही. ते सुरू झालेलं नसताना पर्यावरणाची दोन कलमं लावून सांडपाणी समुद्रात जातंय असा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्यानं दाखल केला. हे रिसॉर्ट सुरू नाही, हे पोलिसांनी सांगितलं आहे; तरीही ही कारवाई केली गेली.’
‘माझ्याविरोधात आणि साई रिसॉर्टविरोधात ही कारवाई झाली. मी त्यांना (ईडी) सगळी उत्तरं दिली आहेत. यापूर्वीही उत्तरं दिली होती. आजही सगळी उत्तरं दिली आहेत. यापुढेही मला प्रश्न विचारले गेले, तर मी उत्तरं देईन,’ असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
‘आर्थिक गैरव्यवहारांचा मुद्दा कुठे येतो ते काही मला कळत नाही. मात्र मी यंत्रणांना सहकार्य करतो आहे. यापुढेही करणार आहे. आजची जी चौकशी होती ती साई रिसॉर्टसंदर्भातील होती. माझ्याशी संबंधित ज्या लोकांवर कारवाई झाली त्यातल्या किती लोकांचा रिसॉर्टशी संबंध आहे?,’ असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.
ADVERTISEMENT