मुंबईचं CSMT म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन हे प्रवाशांनी आणि लोकांनी गजबजलेलं स्टेशन असतं. बाहेरगावी जाणाऱ्या सगळ्या एक्स्प्रेस ट्रेन आणि लोकल ट्रेन्स इथूनच सुटतात. शुक्रवारी रात्री उशिरा एका अज्ञात माणसाने फोन करून छत्रपती शिवाजी टर्मिनसवर बॉम्ब ठेवण्यात आल्याचं सांगितलं. त्यानंतर या ठिकाणी तातडीने रेल्वे पोलीस, जीआरपी आणि आरपीएफचे जवान दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी केली. बॉम्ब निरोधक पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं. साधारण तीन ते चार तास या ठिकाणी तपास सुरू होता. मात्र कुठलंही स्फोटक मिळालं नाही.
ADVERTISEMENT
शुक्रवारी रात्री एका अज्ञात माणसाने पोलीस कंट्रोल रूमला फोन करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचं कळवलं होतं. पोलिसांनी रात्री उशिरा आलेल्या या फोनची दखल घेत तातडीने या ठिकाणी धाव घेतली. तसंच बॉम्ब निरोधक पथकही या ठिकाणी दाखल झालं होतं. मात्र काहीही स्फोटक मिळालं नाही. आता हा फोन नेमका कुणी केला होता? त्याचा त्यामागचा हेतू नेमका काय होता या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत.
मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे स्टेशन ही एक महत्त्वाची आणि हेरिटेजचा दर्जा मिळालेली वास्तू आहे. इंग्रजांच्या काळात या स्टेशनचं बांधकाम करण्यात आलं आहे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत आहे. या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची, प्रवाशांची कायमच वर्दळ असते. या स्टेशनचं नाव सुरूवातीला व्हिक्टोरीया टर्मिनस असं होतं जे नंतर बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं करण्यात आलं. या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन कुणी आणि कोणत्या उद्देशाने केला होता याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
ADVERTISEMENT