आज पुण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टिकेची तोफ डागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी नगर मी म्हणतो आहे मग नामांतर झालं काय आणि नाही काय? हे वाक्य उच्चारलं होतं त्या वाक्याचा आज राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. तू म्हणतोस म्हणजे काय? तू कोण आहेस? असा सवालच राज ठाकरेंनी केला.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणले राज ठाकरे?
उद्धव ठाकरेंनी एका गोष्टीचं उत्तर द्यावं तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का? ९२-९३ ला दंगल झाली त्याचीच उदाहरणं द्यायला पाहिजे. औरंगाबादचं संभाजी नगर झालं काय आणि नाही काय? मी बोलतो ना.. अरे तू कोण आहेस? सरदार वल्लभभाई पटेल आहेस की महात्मा गांधी आहेस? असा सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. अनेक प्रश्न शहरांमध्ये आहेत. त्याबद्दल कुणीही का बोलत नाही?
आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो आहे की औरंगाबादचं नामांतर संभाजी नगर करा आणि यांचं राजकारण मोडीत काढा. या सगळ्यांनी या सगळ्या राजकारणात MIM ला मोठं करा. निजामाच्या अवलादी महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या. स्वतःच्या राजकारणासाठी यांचा वापर केला गेला. MIM चा खासदार निवडून येतो आणि शिवसेनेचा पडतो. हे सगळं निर्माण कुणी केलं? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
आणखी काय म्हणाले राज ठाकरे?
परवाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा झाली. काय पोरकटपणा सुरू आहे कळलंच नाही. आमचं खरं हिंदुत्व यांचं खोटं हिंदुत्व. तुम्ही काय वॉशिंग पॉवडर विकताय का? हिंदुत्व काय आहे याचे रिझल्ट पाहिजेत लोकांना ते आम्ही देत आहोत. म्हणून हे सगळं झोंबतं आहे. १२-१४ वर्षांपूर्वीचं आंदोलन आठवा… महाराष्ट्रात रेल्वेभरती होती त्यावेळी तिकडच्या राज्यातली लोकं महाराष्ट्रात आली. आपले लोक आधी भेटून बोलायला गेले होते. तिथे बोलता बोलता बाचाबाचीत आपल्या एका सैनिकाला आईवरून शिवी दिली. तिथून सगळं प्रकरण सुरू झाली. महाराष्ट्रात रेल्वे भरती आहे याच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या पोरांना माहित नव्हतं. तिथल्या जाहिराती उत्तर प्रदेश बिहारमध्ये येत होत्या. उद्या जर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रेल्वे भरती होत असेल तर तिथल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मग महाराष्ट्रात मी मागणी केली तर चूक काय? असाही सवाल राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे अर्धवट आंदोलन सोडतो अशी टीका जे करत आहेत त्यांनी मला एक आंदोलन दाखवावं की जे मी अर्धवट सोडलं. मनसेने एकही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. पाकिस्तानी कलावंत बॉलिवूडमध्ये येत होते त्यांना देशातून हाकलं. रझा अकदमीचा मोर्चा काढला तो फक्त मनसेने. बाकी कुणी तेव्हा आलं नाही त्यामुळे कोणत्या हिंदुत्वाच्या गोष्टी असोत.
तुम्ही सगळ्यांनी हे सगळं राजकारण समजून घेणं आवश्यक आहे. ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं ज्यांना आपले लाऊडस्पीकरचा मुद्दा झोंबला ते सगळे आपल्या विरोधात एकवटले. साधी गोष्ट लक्षात घ्या ना ते राणा दाम्पत्याचं उदाहरण घ्या. राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार होते. तो बंगला म्हणजे काय मशिद आहे का? मग त्यांना अटक झाली. वेगवेगळ्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. मग जामीन झाला. शिवसेना वाट्टेल ते त्यांना बोलत होती, ते वाट्टेल ते बोलत होते. त्यानंतर लडाखमध्ये संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेला या सगळ्या गोष्टींचं काहीच वाटलं नाही? हे सगळे ढोंगी आहेत. यांचं हिंदुत्व नुसतं पकपक पक करण्यापुरतंच आहे. यांना दुसऱ्या गोष्टीच नको आहेत असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT