भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०१७ मध्ये भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या आघाडीचा प्रस्ताव होता. तशी चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्याबरोबर झाली होती, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. आता शेलारांच्या या विधानावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया उमटतात हे बघावं लागणार आहे.
ADVERTISEMENT
लोकसत्ताने आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात आमदार आशिष शेलार यांनी हे विधान केलं आहे. शेलार यांनी शिवसेना-भाजप युतीचा काळ, शिवसेनेबरोबरचा दुरावा, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरची परिस्थिती, भाजपची आगामी वाटचाल, मनसेबरोबरील युती आणि भोंग्यांच्या वादासह इतर मुद्द्यांवर भाष्य केलं.
पंतप्रधानांनी इतर विषयांच्याच तारा जास्त छेडल्या; संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र
“भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी संयुक्त सरकारची २०१७ मध्येच सारी तयारी झाली होती. राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढायच्या याची सारी चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर झाली होती. शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास राष्ट्रवादीने विरोध केल्याने तीन पक्षाचं सरकार तेव्हा स्थापन झालं नाही. दुसरीकडे २०१९ मध्ये त्याच शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनं सलगी केली,” असं आशिष शेलार या कार्यक्रमात म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेनेचे मंत्री व नेते खिशात राजीनामे ठेवल्याची आणि जहरी भाषा वापरुन त्रास देत होते. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करण्याचा निर्णय झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेताना खात्यांचे वाटप, निवडणुकांमधील जागावाटप अशी सारीच चर्चा झाली होती.”
“तेव्हा सरकार हे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या तीन पक्षांचे असावे. शिवसेनेला सरकारमधून दूर करू नका, असा आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं दिला होता. मात्र, शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास राष्ट्रवादीने नकार दिला. आम्हाला शिवसेनेला सरकारमधून काढायचे नव्हते. हिंदूत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची साथ सोडू नये, अशी भाजपचा प्रामाणिक भूमिका होती. शिवसेनेला बरोबर घेण्यात राष्ट्रवादीच्या विरोधामुळेच तीन पक्षांच्या सरकार स्थापन होऊ शकले नाही”, असा दावा शेलारांनी केला आहे.
शिवसेना काय म्हणाली?
शेलारांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “मला असं वाटत नाही. कुणीतरी अफवा पसरवतंय. काय घडलं आणि काय घडणार आहे, हे मला माहिती आहे. कालच बोलत नाही. उद्या काय घडणार आहे, हे मला माहिती आहे. जुन्या पाचोळ्यावर पाय ठेवून कशाला आवाज करताय. असं काही घडलेलं नाही,” असं राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT