अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतली. भाजपच्या माघारीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपनं घेतलेल्या या भूमिकेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. तर उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’तून भाजपला कोपरखळ्या लगावत खडेबोल सुनावण्यात आलेत. दरम्यान, सामनातल्या टीकेला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी उत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत भाजपनं ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला. भाजपनं घेतलेल्या भूमिकेबद्दल राजकीय अंगानं चर्चा होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं थेट इशारा दिलाय. सामना अग्रलेखातून भाजपवर टीकेचे बाण डागताना ठाकरेंनी शिंदे गटाला मिंधे गट म्हणत डिवचलं आहे.
सामना अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेवर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर देत पलटवार केलाय. आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरेंना उत्तर दिलंय.
Andheri Bypoll : भाजपने माघार घेतल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
आशिष शेलार सामनातल्या अग्रलेखाबद्दल काय म्हणाले?
सामनातल्या अग्रलेखातल्या टीकेला उत्तर देताना शेलार म्हणाले, “सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला ‘गणपत वाणी’ आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच. सोबत आपल्या गल्लीत कोणी नाही ना, याची खात्री करुन पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले! अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ!”, असं शेलार म्हणाले.
पुढे शेलार म्हणाले, “भाजपने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या 397 जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच नंबर एक आहोत, हे कर्तृत्व आकडेवारीतून दाखवून दिलं. खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो. नाही तर पेग्विन सेना घरात बसून ‘गणपत वाण्या’सारखी नुसतीच स्वप्न बघणार”, अशा शब्दात शेलारांनी सामनातल्या अग्रलेखावरून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय.
सामना अग्रलेखातून भाजपवर काय टीका करण्यात आलीये?
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सामनात म्हटलंय की, ‘भाजपचे माघारी नाटय़ हे दिसते तसे सरळ नाही. पराभव झाला तर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले असावे आणि शिवसेनेची मशाल जिंकणारच आहे याची खात्री भाजपला पटली असावी. शिवसेनेची ही ‘भडकलेली मशाल’ बेइमानीचे इमले जाळून टाकेल. त्यापेक्षा आता माघार घ्यावी हेच बरे, हा सुज्ञ विचार भाजप व मिंधे सरकारने केलेला दिसतो.’
Andheri Bypoll : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या निर्णयाबाबत म्हणाले, “महाराष्ट्राची परंपरा…”
‘भाजप उमेदवाराच्या उमेदवारी अर्जात अनेक गफलती समोर आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याचा धोका होता. या धोकादायक वळणावर भाजप आणि मिंधे गटाच्या गाडीस अपघात होणारच होता. त्या धोक्यातून सुटका करून घ्यायची म्हणून अचानक गाडीस ब्रेक मारून भाजपने ‘यू टर्न’ घेतला’, असंही सामना अग्रलेखात म्हटलेलं आहे.
‘आधी ऐटीत बेटकुळय़ा फुगवून शड्डू ठोकणाऱ्यांना कुस्तीआधीच मशालीची धग आणि चटके बसले व त्यांनी कुस्ती न खेळताच मैदान सोडले. अब्रू वाचावी म्हणून ‘झाकली मूठ…’ बंदच ठेवण्याचा भाजपायी मंडळींचा माघारीचा निर्णय हा महाराष्ट्रात एका त्वेषाने पेटलेल्या शिवसेनेच्या ज्वालाग्राही मशालीचा पहिला विजय आहे. बूड भाजण्यापेक्षा तोंड भाजलेले बरे म्हणून भाजपने दारुण पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी माघारीचा सोपा मार्ग निवडला. पण ‘सेफ पॅसेज’ शोधूनही जी बेअब्रू व्हायची ती झालीच’, असं म्हणत ठाकरेंनी सामना अग्रलेखातून भाजपला टोला लगावलाय.
ADVERTISEMENT