देशातील पाच राज्यात मतदान पार पडलं असून, उद्या म्हणजेच १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मात्र तत्पूर्वी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये काही राज्यातील चित्र स्पष्ट दिसत आहे. तर काही राज्यात कोण सत्तेत येऊ शकत, याबद्दलच चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे या राज्यांमध्ये राजकीय हालचालींनी वेग घेतला. भाजप आणि काँग्रेसकडून बहुमताजवळ पोहोचणारा आकडा मिळल्यानंतरच्या तडजोडी करणं सुरू झालं आहे.
ADVERTISEMENT
एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशसह काही राज्यात कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार याबद्दलचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. मात्र, गोवा आणि उत्तराखंडमधील निवडणूक त्रिशंकू होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गोव्यातील सत्ताधारी भाजपबरोबर काँग्रेसही कार्यान्वित झाल्याचं दिसत आहे. हीच स्थिती उत्तराखंडमध्येही आहे.
गोव्यातील निवडणुकीच्या निकालाबद्दल सर्वच एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू स्थिती असेल असा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार गोव्यात एकूण ४० जागांपैकी भाजपला १४ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला १५ ते २० जागा मिळू शकतात, अशी शक्यता आहे.
सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार भाजप १३ ते १७ जागा जिंकेल असा अंदाज आहे. तर काँग्रेसला १२ ते १६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. अशाच स्वरुपाचे कल इतर काही एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. त्यामुळे एकदंरित गोव्यात त्रिशंकू स्थिती असण्याची शक्यता आहे.
गोव्यात त्रिशंकू निकाल येणार असल्याची शक्यता असल्यानं भाजप सक्रिय झाली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यानंतर दिल्लीत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचबरोबर गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
दुसरीकडे मागच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी आणि हातातून गेलेल्या सत्तेमुळे काँग्रेस यावेळी सर्तक झाली आहे. काँग्रेसने एक्झिट पोलनंतर आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसने विजयी उमेदवारांनी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत.
काँग्रेसने गेल्या वेळी प्रमाणे घोडेबाजार होऊ नये म्हणून यावेळी पक्षाच्या उमेदवारांना सांभाळण्याची महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर सोपवली आहे. काँग्रेसने सध्यातरी पक्षाच्या उमेदवारांना गोव्यातीलच एका रिसॉर्टमध्ये ठेवलं आहे. त्यांना राजस्थानात पाठवण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंंत्री पी. चिदंबरम हे सुद्धा गोव्यात दाखल झाले आहेत.
उत्तराखंडमध्ये काय सुरूये?
उत्तराखंडमध्येही एक्झिट पोलनंतर राजकीय वर्तुळात बैठका वाढल्या आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी आणि माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची भेट घेतली आहे. भाजप नेत्यांच्या भेटीगाठींमुळे काँग्रेसही सर्तक झाली असून, काँग्रेसने आपल्या आमदारांना काँग्रेसशासित राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.
ADVERTISEMENT