धक्कादायक ! वसई लोकलमध्ये तरुणीवर जीवघेणा हल्ला करत लुटलं

मुंबई तक

• 08:03 AM • 17 Feb 2021

लॉकडाउन काळात राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सामान्य लोकांना ठराविक वेळेत लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. मात्र या प्रवासादरम्यान महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. वसई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरुणीवर हल्ला करुन तिच्याजवळचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून अशाच परिस्थितीत तिने रुग्णालय […]

Mumbaitak
follow google news

लॉकडाउन काळात राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सामान्य लोकांना ठराविक वेळेत लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. मात्र या प्रवासादरम्यान महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. वसई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरुणीवर हल्ला करुन तिच्याजवळचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून अशाच परिस्थितीत तिने रुग्णालय गाठलं. दरम्यान पोलिस आरोपीचा शोध घेण्यासाठी वसई आणि नायगाव रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.

हे वाचलं का?

मुळची वसईला राहणारी ही तरुणी आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी चालली होती. सकाळी साडेसात वाजता तरुणीने वसई स्टेशनच्या १ नंबर प्लॅटफॉर्मवरुन अंधेरीला जाणारी स्लो गाडी पकडली. ट्रेन सुरु होताच आरोपी डब्यात चढला आणि त्याने तरुणीजवळचा मोबाईल खेचण्यास सुरुवात केली. “महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपीला डब्यात शिरताना तरुणीने पाहिलं नव्हतं त्यामुळे अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तिला काय करावं हेच समजलं नाही. आरोपीने आपल्याजवळ असलेल्या एका वस्तुने तरुणीच्या डोक्यावर हल्ला केला. तोपर्यंत तरुणीने आरोपील विरोध करायला सुरुवात केली होती. या झटापटीत तरुणीजवळची वस्तू ट्रेनबाहेर फेकली गेली. यानंतर आरोपीने तिच्या गळ्यातली चेन ओढून नायगाव स्टेशन येताच उडी मारुन पळ काढला”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या हल्ल्यात तरुणीच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त यायला लागलं. या परिस्थितीतूनही स्वतःला सावरत तिने रुग्णालय गाठलं. डॉक्टरांनी तरुणीवर उपचार केले असून तिला टाके पडले आहेत. कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल तरुणीने वसई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी डब्यात एकटी आहे याकडे लक्ष ठेवून आरोपीने वेळ साधून डब्यात प्रवेश केला. वसई रेल्वे स्थानकात हा आरोपी चकरा मारत असल्याचं पोलिसांना दिसलं आहे. त्यामुळे या आरोपीला पकडण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

    follow whatsapp