पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानतल्या एका रॅलीत गोळीबार करण्यात आला आहे. गुजरानवाला या ठिकाणी रॅली सुरू असताना इम्रान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यानंतर इम्रान खान यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लाहोरमधल्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इम्रान खान यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत अशी माहितीही समोर येते आहे.
ADVERTISEMENT
इम्रान खान यांच्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी केला गोळीबार
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पाच हल्लेखोरांनी गोळीबार केला अशी माहितीही समोर येते आहे. त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान हादरला आहे. पाकिस्तानात सध्या राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तसंच देशात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी माजली आहे अशात ही घटना घडणं हे धक्कादायक मानलं जातं आहे.
AK 47 ने हल्ला करण्यात आल्याचा फवाद चौधरींचा दावा
इम्रान खान यांच्यावर AK 47 ने हल्ला करण्यात आला अशी माहितीही मिळते आहे. फवाद चौधरी यांना हा दावा केला आहे. या हल्ल्यात इम्रान खान जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. या घटनेचा एक व्हीडिओही समोर आला आहे ज्यामध्ये हल्लेखोर एके ४७ सह दिसत आहेत. पोलिसांनी या हल्लेखोरांपैकी एकाला अटक केली आहे.
ADVERTISEMENT