– इसरार चिश्ती, औरंगाबाद प्रतिनिधी
ADVERTISEMENT
२०१४ लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काळ्या पैशावरुन काँग्रेस सरकारवर टीका करताना नरेंद्र मोदींनी, काळा पैसा भारतात आला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील असं आश्वासन दिलं होतं. नरेंद्र मोदींच्या या आश्वासनावरुन आजही भाजप नेत्यांवर टीका होते. परंतू औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एका शेतकऱ्याच्या जनधन खात्यात १५ लाख रुपये जमा झाले.
या शेतकऱ्यालाही नरेंद्र मोदींनी आपलं आश्वासन पाळत १५ लाख रुपये जमा केल्याचं वाटलं. यानंतर या पैशातून त्याने आपलं घर बांधल्यानंतर सत्य समोर आलं आणि आता या शेतकऱ्यावर हे पैसे परत करण्याची वेळ आली आहे.
जाणून घ्या काय आहे हा प्रकार?
पैठण तालुक्यातील, दावरवाडीतील शेतकरी ज्ञानेश्वर जनार्दन औटे यांच्या बँक ऑफ बडोदाच्या जनधन खात्यावर १७ ऑगस्ट २०२१ रोजी १५ लाख ३४ हजार रुपये जमा झाले. पैसे जमा झाल्याचं पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर यांना काय कराव सुचत नव्हते. पैसे कसे आले असे अनेक प्रश्न त्यांना पडले, मात्र हे पैसे पंतप्रधान मोदींनी मोदी यांनी पाठवले असं त्यांना वाटलं. जनधन मध्ये पैसे आले तर चर्चा तर होणारच, मग काय अनेकांनी ज्ञानेश्वर यांचे अभिनंदनही केलं. इतकच नव्हे ज्ञानेश्वर यांनी पंतप्रधान कार्यालयाला मेल करत आभार मानले.
खरा प्रकार आला समोर आणि आनंदावर पाणी पडलं –
मिळालेल्या १५ लाखांपैकी ज्ञानेश्वर यांनी ९ लाख खर्च करुन गावात आपलं घर बांधलं. इतर पैशांचं नियोजन सुरु असताना त्यांना ग्रामपंचायतीने धक्का दिला. पिंपळवाडी ग्रामपंचायतला जिल्हा परिषद कडून मिळणारे १५ व्या वित्त आयोगाचे पैसे खात्यावर न येता ते पैसे औटे यांच्या खात्यावर जमा झाल्याच ४ महिन्यांनंतर ग्रामपंचायतीला लक्षात आलं. आता ग्रामपंचायतीने ज्ञानेश्वर यांना पैसे परत करण्यासाठी पत्र पाठवले. पैसे खर्च झाल्याने ते परत कसे करणार असा प्रश्न पडल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
खर्च केल्यावर उरलेले ६ लाख परत करता येतील मात्र घर बांधण्यासाठी वापरलेले पैसे कसे आणायचे अशी समस्या आता ज्ञानेश्वर यांच्यासमोर तयार झाली आहे.
ADVERTISEMENT