इन्फोसिस फाऊंडेशनच्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या लेखिका सुधा मूर्ती यांनी सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची भेट घेतली. एवढंच नाही तर सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडेंना वाकून नमस्कारही केला. संभाजी भिडे हे टिकली प्रकरणामुळे चर्चेत आहेत. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त होतं आहे. सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्यात काही मिनिटं चर्चा झाली.
ADVERTISEMENT
वाचा सविस्तर काय घडलं?
इन्फोसिस फाऊंडेशनच्या प्रमुख आणि समाजकार्यासाठी सुधा मूर्ती ओळखल्या जातात. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर जगभरात सुधा मूर्ती यांची चर्चा झाली होती. कारण सुधा मूर्ती या ऋषी सुनक यांच्या सासूबाई आहेत. सुधा मूर्ती यांनी सोमवारी सांगलीत शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडे यांना वाकून नमस्कार केला. त्याची चर्चा आता सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान सुधा मूर्ती या सांगलीतल्या भावे नाट्यगृहात आल्या होत्या. त्यावेळी तिथे संभाजी भिडेही आले होते. नाट्यगृहाच्या आवारातच या दोघांची भेट झाली. संभाजी भिडे यांची भेट झाल्यानंतर सुधा मूर्ती यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर काही वेळ दोघांमध्ये संवाद झाला. सुधा मूर्ती यांनी नृसिंहवाडीतील दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शनही घेतलं. त्यानंतर सुधा मूर्ती या त्यांचं बालपण गेलेल्या कुरुंदवाड येथील घरीही गेल्या होत्या. अनेक दशकांनंतर त्यांनी या घराला भेट दिली. त्यांनी यावेळी आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला
टिकली प्रकरण काय आहे?
मागच्या आठवड्यात संभाजी भिडे मंत्रालयात आले होते. तिथे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ते बाहेर पडत असताना त्यांना साम मराठी या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिडे आपण मुख्यमंत्र्यांना का भेटायला का आला होतात? हा प्रश्न विचारला. तेव्हा तू आधी टिकली किंवा कुंकू लावून ये त्यानंतर मी तुझ्याशी बोलेन. आम्ही प्रत्येक स्त्री मध्ये भारतमातेचं रूप पाहतो आणि भारतमाता विधवा नाही असं उत्तर संभाजी भिडे यांनी दिलं होतं. त्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता.
ADVERTISEMENT