मुंबई : मागील आठवड्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भास्कर जाधव यांनी राज्याच्या गृहमंत्रालयाने आपली सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला होता. ही सुरक्षा काढून घेतल्यानंतर आपल्या घरावर हल्ला झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भास्कर जाधव यांना आता मावळचे शिवभक्त बाबाराजे देशमुख यांचे सुरक्षाकवच मिळणार आहे. याबाबत स्वतः भास्कर जाधव यांनी फेसबुकच्या माध्यमातून माहिती दिली.
ADVERTISEMENT
भास्कर जाधव काय म्हणाले?
मावळ येथील कट्टर शिवभक्त बाबाराजे देशमुख आज मला भेटायला आले होते. एकीकडे शासनाने माझे संरक्षण काढून घेतले आणि दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भेटायला आलेल्या बाबाराजे यांनी मला सांगितलं, “तुम्ही बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरा आणि राज्यभर तुमच्या भाषणांचा सुरू असलेला धडाका असाच चालू राहू द्या, संरक्षणाची चिंता करू नका. जिथे जाल तिथे तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ..!!”
बाबाराजे, आपण अत्यंत आपुलकीच्या नात्याने भेटून मला पाठिंबा दिलात, त्याबद्दल आपले व आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार !!
राज्य सरकारनं संरक्षण काढल्यानंतर घरावर हल्ला -भास्कर जाधव
घरावर हल्ला झाल्यानंतर आमदार भास्कर जाधव म्हणाले होते, “मागचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला संरक्षण दिलं होतं. माझ्याबरोबर एसपीओचे पोलीस दिले होते. पण काल रात्री घराजवळच संपूर्ण अचानकपणे संरक्षण काढलं गेलं. घराजवळ तीन पोलीस असायचे, तेही तिथे हजर नव्हते. मुंबईतही घराखालचे पोलीसही हजर नाही. याचा अर्थ सरकारनं माझं संरक्षण काढल्यानंत हल्ला झालेला आहे”, असा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय.
देवेंद्र फडणवीसांनी सुरक्षा काढली? भास्कर जाधव काय म्हणाले?
“मी कुणाकडून फार काही अपेक्षा करत नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असं काही होईल याचा विचार मी कधीही केला नव्हता. कारण त्यांचे आणि माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. मी त्यांना एक सुसंस्कृत राजकारणी समजतो. पण तेच पोलीस खात्याचे प्रमुख आहे. निश्चितपणे योग्य ठिकाणाहून मग गृहमंत्री असतली किंवा मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री असं करतील असं वाटत नाही, पण गृहमंत्र्यांकडूनच हे आदेश आले असावेत”, असं म्हणत भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केलाय
ADVERTISEMENT