वसंत मोरे, बारामती : एकीकडे रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरु असताना दुसरीकडे या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामॉल औषधाचे लिक्विड भरून ते रेमडिसीवीर इंजेक्शन म्हणून विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत उघडकीस आला. विशेष म्हणजे हे बनावट रेमडिसीवीर इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट रेमडेसिवीर विकणारी टोळी गजाआड झाली आहे.
ADVERTISEMENT
याप्रकरणी दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, शंकर भिसे आणि प्रशांत घरत या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बारामतीसह राज्यभर रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या काळात रुग्णसेवेसाठी अनेकजण झटत असताना दुसरीकडे कोरोना संकटात गैरफायदा घेत मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार बारामतीत केला जात आहे. इतके सगळे घडत असताना प्रशासन नेमके काय करत होते, असा सवालही आता उपस्थित होवू लागला आहे.टतील
बारामतीतील एका रुग्णाच्या नातेवाईकाला रेमडेसिवीरची तातडीची गरज असल्याने त्याने या टोळीतील एका सदस्याशी संपर्क साधला. तो एका कोविड सेंटरमध्ये काम करतो. त्याच्याकडे इंजेक्शन असल्याची माहिती गरजूला मिळाली होती. त्यानुसार इंजेक्शन देणा-याने त्याला शहरातील फलटण चौकात येण्यास सांगितले. एका इंजेक्शनचे 35 हजार असे दोन इंजेक्शनचे 70 हजार द्यावे लागतील, अशी मागणी केली.
पोलिसांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी सापळा रचून या टोळीतील प्रशांत घरत, शंकर पिसे, दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड यांच्यासह फॉर्च्यूनर गाडी ताब्यात घेतली आहे.
या चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली. राज्यात रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. काही ठिकाणी काळाबाजार सुरू आहे. मात्र तरीदेखील इंजेक्शन मिळत नाहीत. याच संधीचा फायदा घेत या टोळीने बनावट रेमडिसीवीर तयार करण्याची योजना आखली. त्यानुसार कोविड सेंटरमधील रिकाम्या झालेल्या रेमडेसिवीरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉल पाण्यामध्ये मिसळून त्याचे लिक्विड बाटलीत भरुन फेविक्विकने बंद केले जात होते. हे बनावट औषध तयार करून ते विकले जात होते. रुग्णांच्या जीवाशी त्यातून खेळ केला जात होता. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तक्रार घेत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली आहे.
बारामतीत रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामतीत घेतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे घेतलेल्या आढावा बैठकीत देखील पोलिसांना अशा काळाबाजार रोखण्यास सूचना केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी असा धक्कादायक प्रकार समोर आल्याने बारामतीत नेमकं चाललय काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ADVERTISEMENT