योगेश पांडे, नागपूर: नागपुरातील सीताबर्डी पोलिसांनी एका अशा आरोपीला अटक केली आहे जो चक्क आपल्या गर्लफ्रेंडसाठी फक्त मोपेड गाड्यांची चोरी करायचा. पोलिसांनी रिषभ उर्फ लालू श्याम असोपा (वय 28 वर्ष रा. खांडवानी टाऊन, वाठोडा, नागपुर) याला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी तब्बल बारा नवीन मोपेड दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
ADVERTISEMENT
ऋषभला अटक केल्यानंतर पोलीस तपासात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आरोपीला त्याच्या गर्लफ्रेंडवर प्रचंड पैसे खर्च करायचे होते. तसेच इतरही मौजमजा करायला मिळावी यासाठी तो नवनव्या मोपेड बाइक चोरत असल्याचं जबाबत म्हटलं आहे.
मास्टर चावीच्या सहाय्याने बाइकचे लॉक उघडून तो नवीन मोपेड गाड्यांना आपले लक्ष करत असे. आरोपी हा गेल्या अनेक दिवसांपासून वाहन चोरीमध्ये सक्रिय होता. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
ऋषभने नागपुरातील सीताबर्डी, तहसील, लकडगंज, नंदनवन, कोतवाली, तहसील, हुडकेश्वर आणि गणेशपेठ या पोलिस स्थानकांच्या हद्दीतून एक दोन नव्हे तर 12 बाइक चोरल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे आता त्याच्याविरुद्ध नागपुरातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खरं तर नागपूर पोलिसांनी एका दुचाकी चोरीच्या प्रकरणात आरोपी ऋषभला अटक केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीताबर्डी पोलिसांनी आरोपी रिषभची जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा त्याने 12 बाइक चोरल्याची कबुली दिली आहे. सध्या पोलीस याप्रकरणात पुढील तपास करत आहेत. तसेच या चोरीमध्ये त्याला आणखी कोणाची साथ होती का? याची देखील पोलीस आता चौकशी करत आहेत.
नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यातही तरुण मुलं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असल्याने नागपूर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे नागपुरात गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान नागपूर पोलिसांसमोर आहे.
ADVERTISEMENT