नागपूरसह विदर्भातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येचा वेग हा झपाट्याने वाढत असून शहरात दररोज १ हजाराच्या वर नवीन रुग्ण सापडत आहेत. अशा खडतर परिस्थितीतही नागपूरच्या शासकीय मेडीकल कॉलेजमधलं १२० खाटांचं आयसीयू युनिट निधीअभावी बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
नागपूरच्या मेडीकल कॉलेजमधील ३३६ खाटांपैकी १५६ खाटा सध्या भरलेल्या असून १२० खाटांचा अतिदक्षता विभाग आग प्रतिबंधक यंत्रणाच नसल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. सध्याच्या रुग्णवाढीचा वेग पाहता, भविष्यात परिस्थिती हाताबाहेर गेली तर रुग्णांची व्यवस्था करायची कुठे असा प्रश्न मेडीकल कॉलेजच्या प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२० खाटांच्या ICU युनिटचं फायर ऑडीट झालं होतं. परंतू यासाठी ३ कोटींचा खर्च अपेक्षित होता. हा निधीच मिळाला नसल्यामुळे हे युनिट गेल्या दीड महिन्यापासून बंद ठेवण्यात आलं आहे. जानेवारी महिन्यात भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात दहा बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व हॉस्पिटल्सचं फायर ऑडीट करण्याचे आदेश दिले होते.
सध्याच्या घडीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या ५२ खाटा शिल्लक आहेत. ट्रॉमा सेंटरही पूर्ण भरलेले आहे, अशातच रोज वाढणारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाहता १२० खाटांचे आयसीयू युनिट लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान याप्रकरणी नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी डीन डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी मुंबई तकने संपर्क साधला. यावेळी त्यांनी १२० खाटांचं आयसीयू लवकरच सुरु करण्यात येईल असं आश्वासन दिलं.
ADVERTISEMENT