मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी म्हणजेच रविवारी सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता कायम आहे. भोंग्यांचा वाद, सरकारला दिलेला अल्टिमेटम या सगळ्या गोष्टी समोर आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा राज ठाकरेंचं भाषण ऐकून त्यांना तीन मोलाचे सल्ले दिले होते तो किस्सा सांगितला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले राज ठाकरे?
” शिवसेनेत असताना मुंबईत माझी पहिली सभा झाली. साधारण पाच मिनिटं मी बोललो असेन आणि सगळा कार्यक्रम संपला. कुणीतरी माझ्याकडे आलं आणि मला सांगितलं की माँ (मीनाताई ठाकरे) आली आहे. मी म्हटलं माँ? मोर्चाला? तर मी सगळ्या गर्दीतून गेलो तर माँ गाडीमध्ये येऊन बसली होती भाषण ऐकायला. मला पाहिल्यावर म्हणाली बस, काका (बाळासाहेब ठाकरे) वाट बघतोय. त्यावेळी दुपारचे अडीच वाजले होते. बाळासाहेबांची झोपायची वेळ, मी विचारलं काका जागा आहे का? तर ती म्हणाली हो. मग मी घरी आलो तर बाळासाहेब बसलेले होते.”
“बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले की तुझं भाषण ऐकलं, गंमत बघा हां.. त्यावेळी मोबाईल वगैरे काही नसतानाचं हे मी सांगतोय. तर मी विचारलं माझं भाषण कसं ऐकलंस तू? तर माझं भाषण जिथे सुरू होतं तिथे एक पीसीओ होता. तिथून एकाने बाळासाहेबांना फोन लावला होता आणि स्पीकरवरून माझं भाषण त्यांना ऐकवलं होतं. मला बाळासाहेब म्हणाले बस, आता माझ्या बापाने मला जे सांगितलं ते आज मी तुला सांगतो. जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल. आपण किती हुशार आहोत हे भाषणातून सांगू नकोस, लोकं कशी हुशार होतील ते भाषणात येऊ दे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी आज काय बोललो? यापेक्षा मी आज काय दिलं विचार करायला याचा विचार करून भाषण कर. पहिल्या मोर्चाच्या वेळी हे तीन सल्ले मला बाळासाहेब ठाकरेंनी दिले.” अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगतिली आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा दशकपूर्तीच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी हा किस्सा सांगितला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच २ एप्रिलला भाषण केलं होतं. त्यांचं हे भाषण चांगलंच गाजलं. त्यात त्यांनी मशिदींच्या भोंग्यांचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी १२ एप्रिलला ठाण्यात उत्तरसभा घेतली. या उत्तरसभेत त्यांनी त्यांच्यावर झालेल्या टीकेचा समाचार घेतला. आता महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी राज ठाकरे औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेत आहेत. या जाहीरसभेच्या एक दिवस आधी राज ठाकरेंनी बाळासाहेबांनी भाषणाच्या बाबतीत त्यांना काय तीन सल्ले दिले होते त्याचा किस्सा सांगितला आहे.
ADVERTISEMENT