योगेश पांडे
ADVERTISEMENT
नागपूर: नागपुरात लहान मुलांच्या लसींच्या क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून (16 जून) सुरुवात होणार आहे. 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांवर लसींची ट्रायल होणार आहे.
यामध्ये सहा ते बारा वर्षे वयोगटातील 35 मुलांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. लसींच्या ट्रायलपूर्वी या सर्व बालकांची ब्लड टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट देखील करण्यात आली आहे.
भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सीन लसींच्या क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात बारा ते अठरा वर्षे वयोगटातील 41 मुलांची निवड करण्यात आली होती. समाधानाची बाब म्हणजे या सर्व 41 मुलांमध्ये लस घेतल्यानंतर कुठलेही साईड इफेक्ट दिसून आलेले नसल्यामुळे 28 दिवसानंतर त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
‘Corona ची तिसरी लाट लहान मुलांसाठी किती घातक? याबाबत कोणताही डेटा उपलब्ध नाही’
देशात एकूण चार ठिकाणी 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची क्लिनिकल ट्रायल होत आहे. त्यामध्ये एम्स दिल्ली, एम्स पटना, नीलोफर हॉस्पिटल हैदराबाद आणि नागपुरातील मेडिट्रीना हॉस्पिटल यांची क्लिनिकल ट्रायलसाठी निवड करण्यात आली आहे.
नागपूर शहरात लहान मुलांवर होणाऱ्या क्लिनीकल ट्रायल बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. यासाठी सुरुवातीला स्टडी सॅम्पल्स देखील घेण्यात आले आहेत.
देशात 4 ठिकाणी 208 दिवस ही ट्रायल होणार आहे. त्यामुळे या ट्रायलमधून काय निष्कर्ष पुढे येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
0 ते 18 वयोगटातील मुलांवर लसीची क्लिनीकल ट्रायल करण्यासाठी परवानगी मेडिट्रीना हॉस्पिटलला मिळाली आहे. एथिकल कमिटीच्या अंतिम होकारानंतर नागपुरात ही ट्रायल सुरु झाली होती.
लहान मुलांवर लसीची क्लिनीकल ट्रायल घेण्यासाठी 3 टप्पे करण्यात आले आहेत. ज्यात 2 ते 6 वयोगटाचा पहिला टप्पा, 6 ते 12 वयोगटाचा दुसरा टप्पा तर 12 ते 18 वयोगटातील तिसरा टप्पा अशी विभागणी करण्यात आली आहे.
नागपूर : मेडीट्रीना हॉस्पिटमध्ये होणार लहान मुलांवर लसीची क्लिनीकल ट्रायल
राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. कोरोना विषाणूत होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन लवकरात लवकर लहान मुलांवरील लस आणण्याचा तज्ज्ञांचा प्रयत्न सुरु आहे.
ADVERTISEMENT