छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादात भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विधानामुळे भर पडलीये. लोढांनी उद्धव ठाकरेंना औरंगजेब ठरवत शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्रा सुटकेशी केली. भाजपवर निशाणा साधताना आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना डिवचलं.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकारण तापलंय. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जुन्या काळातील आदर्श ठरवलं. तर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सावरकरांनी ब्रिटिशांकडे केलेला अर्ज माफीनामा नव्हता सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेली पत्रांना माफीनामा म्हणायचं का? असं विधान केलं.
दोन विधानावरून राज्यात विरोधकच नव्हे, तर भाजपचेच खासदारच आक्रमक झालेत. भाजपकडून राज्यसभेतील खासदार राहिलेले छत्रपती संभाजीराजे यांनी थेट उठाव करण्याचा इशारा दिला. तर उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी हटवण्याची मागणी केलीये. या सगळ्या वादात मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाने भर टाकली. मंगलप्रभात लोढांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या घटनेशी केली.
कोश्यारी, लोढा या अमराठी नेत्यांच्या विधानांना फडणवीसांची छत्रछाया : अंधारेंचा हल्लाबोल
मंगलप्रभात लोढा काय म्हणाले होते?
“छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं, परंतु छत्रपती शिवराय स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून (शिवसेना, मविआ) बाहेर पडले”, असं लोढा म्हणाले.
लोढाच्या याच विधानावरून विरोधक आक्रमक झालेत. याच मुद्द्यावरून आता आदित्य ठाकरेंनीही निशाणा साधलाय. आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलंय. ज्यात ते म्हणतात, “इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे! ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!”
छत्रपती शिवराय सूर्यासम आहेत, त्यांची तुलना कशी करणार? करुच शकतं नाही : मंगलप्रभात लोढा
आदित्य ठाकरेंबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या इतर नेत्यानीही यावरून भाजपला लक्ष्य केलंय. त्यामुळे आता सगळ्या प्रकरणावर भाजपकडून विरोधकांना काय उत्तर दिलं जातं, हेही महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT