खरंतर वर्ण व्यवस्थेचा पगडा असलेल्या आपल्या देशात प्रत्येक गोष्ट वरून खालच्या अशा उतरणीच्या दिशेनं करण्याची पद्धत रुढ आहे; पण राहुल गांधी यांनी खालून वरच्या दिशेनं पदयात्रा करण्याचा कॉन्शियस निर्णय घेतल्याचं दिसतंय. त्याची कारणंही अनेक असावीत. सामाजिक, प्रादेशिक, भाषिक, भौगोलिक आणि अर्थात राजकीय. म्हणजेच राहुल गांधी यांनी वयाच्या ५२व्या वर्षात प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास सुरु केलाय.
ADVERTISEMENT
थोडा उशीरच झालाय असं अनेकांना वाटेल. पण कधीतरी हे करणं गरजेचं होतं. त्याला प्रचंड आत्मविश्वास, धैर्य, त्याग आणि समर्पणाची तयारी लागेल. ‘भारत जोडो यात्रा‘ त्या दिशेने एक छोटंसं पाऊल म्हणावं लागेल.
कशासाठी निघालीय भारत जोडो यात्रा?
समोर बलाढ्य नरेंद्र मोदी नावाचं व्यक्तिमत्व मागच्या सात-आठ वर्षात जन माणसाच्या मनावर गारुड घालून आहे. त्यांचा चहावाला ते पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास विलक्षण आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या खांद्यावर घर, परिवार, घराणेशाही आणि वैयक्तिक स्वार्थ असं कुठलंही बॅगेज (ओझं) नाही. काम करण्याची अफाट क्षमता आणि त्याला मुत्सद्दीपणाची जोड. यामुळे जननेता ते सक्षम शासक या कसोट्यांवर मोदी स्वतःला सिद्ध करताना दिसताहेत.
मात्र या कौशल्यांचा जोरावर एक विशिष्ठ विचारधारा आणि संगठन विस्ताराच्या अति महत्वाकांक्षेनं मोदींना तिरस्काराचं धनीही बनवलंय. अर्थात ही त्यांची राजकीय अपरिहार्यता आणि आयडियॉलॉजिकल (वैचारिक) जडण घडणीचा भाग आहेच, पण अन-अपॉलॉजिटीक हिंदुत्वाचं राजकारण आणि पॉलिटिक्स ऑफ अपीजमेंट्स म्हणजेच लांगूलचालनाला विरोध यामुळे विरोधकांना, विशेषतः सोयीस्कररित्या धर्मनिरपेक्ष (secular) आणि उदारमतवादी (liberal) असल्याचं भासवणाऱ्यांची मोठी राजकीय कोंडी झाली आहे.
नेमकं याच कारणांमुळे काँग्रेससकट इतर मोठ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या प्रस्थापित नेत्यांना मोदीशाही विरोधात दोन हात करण्यास जड जातंय. कारण मोदी-शाह जोडीला गमावण्यासारखं काहीच नाही, तर दुसरीकडे प्रस्थापितांना आड वळणानं कमावलेलं शाबूत ठेवण्याची चिंता आहे.
अशा परिस्थितीत ‘घराण्याचा गांधी’ नाही तर ‘देशाचा गांधी’ होणं राहुल यांना क्रमप्राप्त झालंय. प्रिव्हिलेज्ड लीडर्स या प्रतिमेच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी त्यांना तपस्या रुपी प्रायश्चित करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या देशातील सर्वात तळागाळाच्या व्यक्तीशी नाळ जोडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यासाठीच त्यांनी स्वतःचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असताना सुद्धा देशाला जोडण्याच्या संकल्पनेला प्राधान्य दिलं आहे.
परिणामी या ‘कॉज अँड इफेक्ट’ थेअरीमुळे पक्षातील प्रस्थापित, विस्थापित आणि नवोदित अशा तीनही स्तरावर मोठी वैचारिक घुसळण होताना पाहायला मिळतेय. यामुळे पक्षात ‘जनरेशनल ट्रान्सफॉर्मेशनची’ प्रक्रिया सुरु झालेली प्रकर्षाने जाणवतेय.
महाराष्ट्रात पोहचलेल्या यात्रेतील निरीक्षणं :
महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेत सहभागी झालो असताना केलेल्या काही निरीक्षणांवरून सांगतो. महाराष्ट्रात काँग्रेस अनेक गटातटांत विभागलीये. ज्यांना भरभरून मिळालं ते एकतर पक्ष सोडून गेलेत किंवा जाण्याच्या तयारीत आहेत. ज्यांना काही मिळण्याची अपेक्षा आहे त्यांना संधीचा अभाव आहे. पण काँग्रेसमधला एक वर्ग असा आहे ज्याला कसलीच अपेक्षा नाहीये. तो परंपरेने किंवा मग परिस्थितीने काँग्रेसी आहे.
असे अनेक काँग्रेसी या यात्रेत पाहायला-अनुभवायला मिळाले. एक पंचाहत्तरीतले वयोवृद्ध हातात तिरंगा घेऊन यात्रेच्या कडेकडेनं चालताना भेटले. या वयात त्यांना राहुलमध्ये आशावाद दिसतोय कारण ते इंदिरा गांधींचे नातू आणि राजीव गांधींचे पुत्र आहेत. ही त्यांच्या पिढीची घराणेशाहीला समर्पित एकनिष्ठता (loyalty) झाली.
पण नंतर पुढच्या टप्प्यावर एक समवयस्क तरुण पत्रकार भेटतो. ज्याची कॉस्ट कटिंगमध्ये नोकरी गेली. पत्रकारिता करताना अनेक निर्बंध आणि व्यावसायिक अस्थिरतेला कंटाळलेला. तो काँग्रेसच्या नव्या लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅमचा भाग झालाय. फक्त प्रस्थापितांचा विरोध आणि धार्मिक ध्रुवीकरणामुळे त्यानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. ही यात्रा राजकीय नसून, गुजरात छत्तीसगडची निवडणूक आम्ही मोठ्या फरकाने हरू असं मान्यही केलं. मात्र या यात्रेचे परिणाम 2026 नंतर दिसतील असा दावा त्यानं केलाय.
या व्यतिरिक्त काँग्रेससशी लवकरच फारकत घेणार म्हणून ज्या अशोक चव्हाण, अमित देशमुख, विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात अशा काँग्रेसचा पिढीजात वारसा असणाऱ्या दिग्गज नेत्यांची नावं राजकीय वर्तुळात सतत चर्चेत असतात अशा सर्व नेत्यांना झाडून या यात्रेनं रस्त्यावर आणलं. इतकंच नाही तर कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला. दिशा आणि ऊर्जा दिली. आता यात्रा त्यांच्या जिल्ह्यातून पुढे निघून गेल्यावर हे नेते हा कनेक्ट कितीकाळ टिकवतात की पुन्हा एकदा त्यांच्या पुढच्या पिढीचे नेतृत्वच कार्यकर्त्यांवर लादतात यावर यात्रेचं यश-अपयश अवलंबून आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात सत्तेत असताना अडीच वर्षात एकदाही राहुल फिरकले नव्हते. पण योगायोगाने महाविकास आघाडीची सत्ता कोलमडायला आणि भारत जोडो यात्रा सुरु व्हायला. त्यामुळे तात्विक दृष्ट्या राहुल यांचा महाविकास आघाडीला कधीच उघड पाठिंबा मिळाला नसला, तरी युतीतील पक्षाच्या जनरेशन नेक्स्ट नेत्यांनी जातीनं भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रात पोहचत हजेरी लावली.
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसच्या मंचावर उपस्थिती नोंदवली. तर ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीतील आदित्य ठाकरेनींही गांधींच्या तिसऱ्या पिढीतील राहुल यांच्या खांद्याला खांदा लावून जवळपास पाच किलोमीटरचे अंतर कापले. विशेष म्हणजे आदल्याच दिवशी सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांवर निशाणा साधला होता. त्यामुळे वैचारिक मतभेदाची कसरत करत हे परस्परविरोधी पक्ष आणखी किती काळ पुढचा प्रवास करू शकतील हा संशोधनाचा विषय आहे.
यात्रेची चळवळ होऊ शकेल का ?
ही पद यात्रा एकट्या राहुल गांधींची नाहीये. या यात्रेत ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) आणि प्रत्येक राज्यातील प्रदेश काँग्रेस कमिटीचे (PCC) चे शेकडो पदाधिकारी यात्री म्हणून जोडले गेलेत. ज्याच्यासाठी प्रचंड मोठी यंत्रणा, अनेक महिन्यांची प्लॅनिंग कॉ-ऑर्डिनेशन आणि अर्थकारण आहे.
सुरुवातीला सोशल मीडियावर फोटोज-व्हिडिओज पाहून यात्रा जेनेरिक असल्याचं वाटत होतं. पण प्रत्यक्षात कव्हर करताना लक्षात आलं कि हा एक नियोजनबद्ध इव्हेंट आहे. कदाचित आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा मोबाइल (फिरता) इव्हेंट.
यातील सगळ्यात मोठा अडसर ठरतोय तो गांधींना असलेल्या थ्रेट परसेप्शन आणि पर्यायाने असलेल्या सुरक्षेच्या विळख्याचा. यामुळे सर्व सामान्य जनता किंवा रँडम लोकांना राहुल यांना थेट भेटता येत नाही. पक्षातील वरिष्ठांनी ठरवलेल्या निवडक सर्व सामान्य लोकांनाच राहुलपर्यंत ऍक्सेस मिळू शकतो. कोण भेटणार, कोण चालणार, कोण बोलणार, कुठे थांबणार, काय खाणार हे सुरक्षेच्या कारणात्सव आधीच ठरवावं लागतं.
यामुळे थेट लोकांशी कनेक्ट होण्याच्या मूळ उद्देशालाच तडा जातो की काय असं वाटत राहतं. यामुळे काँग्रेस पक्षातील एलिटिस्ट कल्चर बदलण्याच्या प्रयत्नांमध्ये अडसर निर्माण होतोय. पण सगळ्यात स्वागतार्ह बाब म्हणजे अशा तक्रारींची व्यवस्थापकांकडून तात्काळ दखल घेऊन शक्य ते बदल केले जात आहेत. विशेष म्हणजे पक्षातील पारंपरिक स्टबर्ननेस सोडायला पक्षातील नवी फळी तयार दिसते. त्यामुळे जसजशी यात्रा पुढे जाईल तसतशी ती जास्त लाकांमध्ये मिसळेल अशी अपेक्षा आहे. तर आणि तरच ही ‘भारत जोडो यात्रा’ होऊ शकेल अन्यथा ‘भारत से हमे जोडो यात्रा’ म्हणून मर्यादित राहील.
शेवटी जाता जाता या यात्रेदरम्यान भेट झालेले शेकाप, भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केलेले माजी आमदार विजय गव्हाणे यांनी या यात्रेचं एका ओळीत केलेलं विश्लेषण सांगतो आणि थांबतो… “शेण जरी जमिनीवर पडलं तर थोडीशी का होईना पण माती घेऊनच जातं…!!!”
ADVERTISEMENT