बिलकिस बानोच्या अपराध्यांना सोडल्या प्रकरणी गुजरात आणि मोदी सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात दोन आठवड्यात सुनावणी होईल. बिलकिस बानो प्रकरणात दोषी व्यक्तींना सोडण्यात आल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात गुजरात सरकार आणि मोदी सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. आरोपींना का सोडलं दोन आठवड्यात उत्तर द्या असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
बिलकिस बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे?
सुप्रीम कोर्टाने दोषींना त्यांची बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तर ११ दोषींच्या सुटकेवर गुजरात सरकारकडून उत्तर मागितलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुभाषिनी अली यांच्यासह चार जणांनी या प्रकरणातल्या ११ दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.
सामाजिक कार्यकर्त्या सुभाषिनी अली यांनी केली होती याचिका दाखल
सामाजिक कार्यकर्त्या सुभाषिनी अली, रोकपी वर्मा आणि पत्रकार रेवती लाल यांनी बिलकिस बानो प्रकरणातील ११ दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. हे ११ दोषी बिलकिस बानोवर सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्या प्रकरणी १५ वर्षे तुरुंगात होते. मात्र गुजरात सरकारने राज्यात लागू केलेल्या सुटकेच्या धोरणानंतर या सगळ्यांची सुटका करण्यात आली. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने भाष्य केलं आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी नोटीस बजावली आहे.
बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण काय?
“२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकावर साबरमती एक्स्प्रेसच्या बोग्या जाळण्यात आल्या. या गाडीतून अयोध्येतून कारसेवक परत आले होते. या दुर्घटनेत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये दंगली भडकल्या.
दंगलीतून वाचण्यासाठी बिलकिस बानो आणि त्यांचं कुटुंब गाव सोडून निघून गेलं. बिलकिस बानो आणि तिचं कुटुंब जिथे लपलेलं होतं, तिथे ३ मार्च २००२ रोजी २० ते ३० लोकांचा गट आला. काठ्या आणि तलवारीने त्यांनी बिलकिस बानोंच्या कुटुंबीयांवर हल्ला केला होता.
बिलकिस बानो यांच्यावर या लोकांनी सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी बिलकिस बानो ५ महिन्यांच्या गर्भवती होत्या. इतकंच नाही, तर आरोपींनी बिलकिस बानो यांच्या कुटुंबातील ७ जणांच्या हत्या केल्या. या हल्ल्यावेळी ६ जण पळून गेले, त्यामुळे वाचले.
११ आरोपींना सोडण्याच्या निर्णयावर बिलकिस बानो काय म्हणाल्या?
“१५ ऑगस्ट २०२२ रोजी २० वर्षांपूर्वी माझ्यावर झालेला आघात पुन्हा एखाद्या संकटाप्रमाणे आदळला. जेव्हा मी ऐकलं की, ज्या ११ आरोपींनी माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं. ज्यांनी माझी ३ वर्षांची मुलगी माझ्यापासून हिरावून घेतली. त्या सगळ्यांची सुटका करण्यात आली. ते आता आनंदित होऊन फिरत आहेत. हे ऐकल्यानंतर मला बोलण्यासाठी शब्दच सूचत नाहीयेत. मी सुन्न झालेय आणि निःशब्द झालेय”, असं बिलकिस बानो यांनी ११ जणांच्या सुटकेनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT