नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील सेक्टर सहा येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात दोन अज्ञात तरुणांनी भाजपचे पदाधिकारी संदीप म्हात्रे यांच्यावर हल्ला केला आहे. रविवारी रात्री उशीरापर्यंत संदीप म्हात्रे कार्यालयात बसलेले असताना त्यांच्यावर हा हल्ला झालाय ज्यात संदीप म्हात्रे गंभीर जखमी झालेत.
ADVERTISEMENT
संदीप म्हात्रे हे स्थानिक भाजप नगरसेविका संगीता म्हात्रे यांचे पती आहेत. रविवारी रात्री आपल्या कार्यकर्त्यांसोबत कार्यालयात बसलेले असताना दोन तरुण अचानक कार्यालयात आले व त्यांनी म्हात्रे यांना तुम्हाला ठार मारु असं म्हणत त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. समयसूचकता दाखवत म्हात्रेंनी हा वार चुकवला परंतू यात त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. रक्तबंबाळ अवस्थेतील म्हात्रेंनी स्थानिकांनी मनपा रुग्णालयात दाखल केलं.
दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी एका हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा पोलीस सध्या तपास करत आहेत. हल्ला व्हायच्या आधी म्हात्रे यांच्या कार्यालयाबाहेर एक महिला संशयास्पद रित्या चकरा मारत होती, या अँगलनेही पोलीस या हल्ल्याचा तपास करत आहेत. आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या संदीप म्हात्रे यांच्यावर हल्ला झाल्यामुळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
ADVERTISEMENT