शिवसैनिकांना एखाद्या दैवताप्रमाणे असलेल्या मातोश्रीविरोधातच शिवसेनेचे निष्ठावंत म्हणवले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं. विधान परिषद निवडणुकीतील विजयाचा उधळलेला गुलाल खाली बसत नाही, तोच शिवसेनेला भगदाड पडलं. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदारांना घेऊन आधी गुजरातमधील सुरत गाठलं. आता आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीत मुक्काम ठोकलाय.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांच्या एका मोठ्या गटाने केलेल्या बंडाळीने राजकीय वर्तुळात हादरा बसला. अचानक झालेल्या राजकीय भूकंपामागे कोण, असे प्रश्न निर्माण होत असतानाच सुरतच्या हॉटेलमध्ये भाजपचे दोन नेते शिवसेनेतील बंडखोर आमदारांसोबत दिसले. त्यानंतर गुवाहाटीत पोहोचलेल्या आमदारांच्या स्वागतासाठीही भाजपचे आमदार आले. ज्या हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार मुक्कामी थांबणार होते, त्या हॉटेलला आसामचे मुख्यमंत्री हिमंत हिमंत बिस्वा शर्मा यांनी सकाळीच भेट दिल्याची माहिती समोर आली.
”आपल्या पाठिमागे देशातील महाशक्ती, त्यांनी सांगितले की…”; शिंदेंचा नवा व्हिडिओ समोर
सुरतच्या विमानतळावर भाजपचे नेते मोहित कंबोज तर माध्यमांना गुंगारा देऊन पळतानाचं कैद झालं… एकापाठोपाठ एक समोर आलेल्या माहितीने या सगळ्यांमागे भाजप तर नाही ना? अशी पाल या घटनांकडे बघणाऱ्या सर्वासामान्यांच्या मनात चुकचुकली. भाजपतून यापासून आम्ही अंतर ठेवून असल्याचं सांगितलं गेलं. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंही स्पष्ट केलं की, याच्याशी भाजपचा संबंध नाही. तर या सगळ्या आमदारांना मुंबईत यावं लागेल हे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
या स्पष्टीकरणानंतर लगेच गुरुवारी सायंकाळी गुवाहाटीतील हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांचा एक व्हिडीओ समोर आला. ज्यात एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांशी बोलत आहेत.
शिवसेना पक्ष प्रमुख होणार का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
या व्हिडीओत शिंदे म्हणाले, “आपली सुख आणि दुखं: एकच आहेत. आपण सर्व मिळून जे होईल त्याला सामोरे जाऊ. विजय आपलाच आहे. आपल्याला देशातील महाशक्तीची साथ आहे. त्यांनी मला सांगितलेलं आहे की, तुम्ही जो निर्णय घेतला आहे, तो ऐतिहासिक निर्णय आहे. तुमच्या मागे आमची सर्व शक्ती आहे. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही याची प्रचिती येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.”
शिवसेनेतील बंडखोर आमदारांमागे भाजप असल्याच्या चर्चेवर अनेक जणांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत, ज्यात ते जाऊ शकतात, असं म्हणत थेट भाजपच्या दिशेनं बोट दाखवलंय.
या बंडामागे भाजप असल्याची व्यंगचित्रे, मीम्स, सोशल मीडियावरील तर्कविर्तक लावणाऱ्या वेगवेगळ्या पोस्ट या सगळ्यांतून एकच सूर उमटताना दिसतोय, तो म्हणजे या सगळ्यांमागे भाजपचं आहे. भाजपच्या नेत्यांचं मौनामुळे या चर्चेला उधाण आलं आहे. भाजप नेते थेटपणे यावर काही बोलताना दिसत नाही. विशेषतः भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या असून, त्यांनी माध्यमांना दूरच ठेवलं आहे.
‘…तर नक्कीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते’; राजकीय गदारोळात संजय राऊतांचं मोठं विधान
भाजपच्या गोटात सुरू असलेल्या हालचाली. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर होत असलेल्या बैठका. भाजप नेत्यांकडून सत्ता येणार असल्याचे संकेत देणारे ट्विट्स (किरीट सोमय्यांनीही फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ट्विट केलंय.) कुठे न कुठे भाजपचा सहभाग अधोरेखित करताना दिसत आहे. त्यामुळे या बंडामागे भाजप असल्याची लोकांची मतं ठाम होताना दिसत आहे.
या सगळ्या चर्चेमध्ये आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केलीये. “महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार नाही. शिवसेनेचे नेते व राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत व राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भाजपचा काहीही संबंध नाही,” असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. पण या राजकीय नाट्याची स्क्रिप्ट कुणी लिहिलीये हे भविष्यात समोर येईल.
ADVERTISEMENT