पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे भाजपचे आमदार (BJP Mla) लक्ष्मण जगताप (Laxman jagtap) यांची मृत्यूसोबतची झुंज संपली. आमदार लक्ष्मण जगताप गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. पुण्यातील (Pune) रुग्णालयात उपचार सुरू असतानाच लक्ष्मण जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. (BJP Mla Laxman jagtap passed away after prolonged illness)
ADVERTISEMENT
आमदार लक्ष्मण जगताप यांना दुर्धर आजाराने ग्रासलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराच्या मदतीने लक्ष्मण जगताप यांची मृत्यूसोबत झुंज सुरू होती. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मण जगताप यांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली. मात्र, परत प्रकृती ढासळल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी (3 डिसेंबर) लक्ष्मण जगताप यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली.
लक्ष्मण जगताप यांचं पार्थिव दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता त्यांच्या पार्थिवावर पिंपरी गुरव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगतापाचं मत ठरलं होतं लाखमोलाचं
जून-जुलै महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आजारपणाला बाजूला सारून मताधिकार बजावला होता. राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीत उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार लढत झाी होती. त्यावेळी लक्ष्मण जगताप यांनी रुग्णवाहिकेनं येऊन मताधिकार बजावला होता.
Laxman jagtap : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली
“चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो, ही प्रार्थना”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
लक्ष्मण जगतापांच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक; म्हणाले,…
लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या करता ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की, चिंचवडचे आमदार आणि पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात ज्यांचं अत्यंत मोलाचं योगदान होतं, असे लक्ष्मणभाऊ जगताप आमच्यातून निघून गेले आहेत. एका दीर्घ आजाराशी ते सातत्यानं संघर्ष करत होते. त्यातून ते बाहेर आले, असं आम्हाला वाटतं असताना पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. आज ते आमच्यातून निघून गेले. आम्हाला पुण्यात जिल्ह्यातून दुसरा धक्का आहे.”
“मागच्या काळात राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत अत्यवस्थ परिस्थितीत, रुग्णवाहिकेत कीट घालून ते पोहोचले. ही पक्षा करिता त्यांची निष्ठा होती. प्रचंड मोठा जनसंपर्क त्यांचा होता. सर्वसामान्य माणसांशी नातं होतं. विकासाची दृष्टी त्यांच्याकडे होती. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात आज वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रोजेक्ट आपण बघतोय, त्याचं कारण लक्ष्मण जगताप यांची दृष्टी आहे. दूरदृष्टी असलेला नेता आमच्यातून निघून केला. आमच्यासाठी ही खूप मोठी हानी आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्या परिवारासोबत आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली अर्पण केली.
ADVERTISEMENT