कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी साताऱ्यातच रोखलं. साताऱ्यातील कराड स्थानकावर किरीट सोमय्या यांना उतरवण्यात आलं आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कराडच्या शासकीय विश्रामगृहावर घेऊन जाण्यात आलं.
ADVERTISEMENT
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यांनंतर आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी आपण मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं होतं.
सोमय्यांनी कोल्हापुरात जाण्याबद्दल भाष्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात आले, तर वाईट परिणाम होतील असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्यासाठी कोल्हापूर बंदीचे आदेश काढले. मात्र, आदेश झुगारुन देत सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना झाले होते.
मुंबई सोडली… पुणेही ओलांडल, पण कराडवर रोखलं
किरीट सोमय्या कोल्हापूरला निघणार असल्याच्या काही तास आधी त्यांच्या मुलुंड येथील घरासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या विरोधाला न जुमानता किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झालेच.
त्यानंतर त्यांचं प्रवास मार्गातील वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. दरम्यान, सोमय्या कोल्हापूरला पोहोचल्यानंतर नेमकं काय घडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच पोलिसांनी त्यांना कराडमध्येच रोखलं.
किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड इथं रेल्वेस्टेशनवर उतरवण्यात आलं. सध्या कराड शासकीय विश्रामगृह येथे किरीट सोमय्या हे थांबले आहेत.
कोल्हापूर अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे यांनी सातारा रेल्वे स्थानकापासून कराडपर्यंत रेल्वेने प्रवास करत किरीट सोमय्या यांना विनंती करून, कराड इथल्या रेल्वे स्थानकावर रेल्वेतून खाली उतरवलं.
पोलिसांनी कराडमध्ये थांबवल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून माहिती दिली. पोलिसांनी मला आदेशावरून कराडला थांबवले आहे. सकाळी ९ वाजता कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश
किरीट सोमय्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सार्वजनिक सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी 20 सप्टेंबर रोजी 5 वाजेपासून ते 21 सप्टेंबर रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली असून, तसे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी काढले आहेत.
ADVERTISEMENT