प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (UBT) आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. या नव्या आघाडीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असून, त्याच्या भविष्यातील परिणामांबद्दलही सध्या चर्चा सुरू आहे. राज्यातील या नव्या आघाडीबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
ADVERTISEMENT
चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रचार सभेसाठी अमरावतीमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या आघाडीलाबद्दल भूमिका मांडली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “वंचित आणि शिवसेनेची युती होत असेल, तर त्यात आम्हाला काहीही आक्षेप नाही. त्यांचा तो अधिकार आहे, मात्र उद्धवजींना स्वतःच्या पक्षाचे आमदार टिकवता आले नाहीत.”
“तिथेच या हराम**** राजकीय चिता पेटेल, हीच बाळासाहेबांना आदरांजली” -सेना
पुढे बोलताना ते म्हणाले, “मोदीजी व देवेंद्रजी यांच्यामध्ये घटक पक्ष कसे सांभाळावे, हे जे गुण आहेत. ते गुण उद्धव ठाकरे यांच्यात नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर कोणत्या गुणांवर जात आहे, हे मला माहित नाही. आपल्याच पक्षातील आमदारांना उद्धवजी सांभाळू शकत नाही, तर घटक पक्षाला काय सांभाळतील?”, असा खोचक सवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
राहुल गांधी, संजय राऊतांना 2047 पर्यंत वाट पाहावी लागेल -चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut Statement)
‘जनतेच्या मनात असेल, तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान होऊ शकतात’, असं विधान शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केलं. त्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रियाही उमटल्या. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अमरावतीत प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाच्या विधानाबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोचक टोला संजय राऊतांना लगावला. “संजय राऊत व राहुल गांधी यांनी 2047 ची वाट पंतप्रधान पदासाठी पाहावी, तसेच राहुल गांधी व संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणे बंद करावं. पंतप्रधान पदाचं स्वप्न त्यांचं खरं होणार नाही. 150 देशांनी मोदींचे नेतृत्व मान्य केलं आहे. जनतेचं समर्थन पंतप्रधान मोदींना आहे”, अशा शब्दात बावनकुळे यांनी राऊतांच्या विधानावर भूमिका मांडली.
ADVERTISEMENT